लडाखच्या महिलाः सायकलिंगपासून मॉडेलिंगपर्यंत अव्वल!

५ ऑगस्ट २०१९ रोजी लडाख केंद्रशासित प्रदेश झाला आणि या परिसराने मोकळा श्वास घेतला. लडाखमधील मुली-महिलांच्या दृष्टीनेही सुवर्णसंधीच ठरली. कारण त्यानंतर लडाखच्या महिला अनेक क्षेत्रांत भरारी घेताना दिसत आहेत. खेळाच्या मैदानापासून मॉडेलिंगचा रँप त्या गाजवताना दिसत आहेत.

पद्मा यांगचेन आणि जिगमित दिस्कित या लडाखमधील नवीन पिढीच्या प्रतिनिधी! त्यांनी फॅशनजगतात आपले नवीन स्थान निर्माण केले आहे. लडाखमधील पारंपरिक पोशाखाचे सौंदर्य खुलवण्यासाठी त्यांनी देश-परदेशात स्वतःची एक नवीन ओळख निर्माण केली आहे. इतकेच नव्हे तर ‘लंडन विंटर फेस्टिवल’मध्ये त्यांना भाग घेण्याची संधी मिळाली. याकच्या फरपासून तयार केलेल्या दिमाखदार पोशाखाला त्यांनी या फेस्टिवलमध्ये सादर केले. देश-परदेशातील मुलींना आपल्या वेगळ्या कलाकुसरीने आकर्षित केले आहे.

लीकजेस आंगमो या सायकलपटूने मुंबई येथील २५ व्या नॅशनल रोड सायकलिंग चँपियनशिपमध्ये सुवर्णपदक मिळवले आहे. सायकलिंग या क्रीडाप्रकारात सुवर्णपदक मिळवणारी ती लडाखची पहिली महिला खेळाडू आहे. ५० किलोमीटर सायकलिंगच्या स्पर्धेत तिने हे पदक मिळवले.
तसेच हिवाळी क्रीडाप्रकारांमध्ये लेह आणि कारगिलच्या महिला खेळाडूंची कामगिरी अविस्मरणीय ठरते आहे. लडाखमध्ये हिवाळ्यात वेगवेगळ्या क्रीडाप्रकारांना प्रोत्साहन देण्यासाठी वेगवेगळ्या स्पर्धा घेतल्या जातात. आईस स्केटिंग, आईस हॉकी, स्नो स्कीईंग ही त्या क्रीडाप्रकारांची नावे. काही दिवसांपूर्वी या भागातील ४१ महिलांनी सात दिवस चालणाऱ्या आईस क्लाईंबिंग महोत्सवात भाग घेतला होता. कडाक्याची थंडी आणि बर्फाची दुलई पांघरलेले डोंगरकडे-दऱ्या… अशा परिस्थितीत या महिलांनी चिकाटीने बर्फाच्छादीत कडे सर केले. असे वेगवेगळे क्रीडाप्रकार मुलींना-महिलांना क्रीडाक्षेत्राकडे आकर्षित करत आहेत.

एकीकडे चीनच्या सीमेवर असलेल्या लडाखला स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी झगडावे लागते आहे, त्याच पार्श्वभूमीवर तेथील महिलांनी वेगवेगळ्या क्षेत्रात घेतलेली भरारी नक्कीच नेत्रदीपक आहे.