अभिनेत्री रोहीणी हट्टंगडी यांनी केला निषेध 

भारतामध्ये गेल्या २२ मार्चपासून लॉकडाऊन सुरु आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी ही प्रक्रीया सरकारतर्फे तात्काळ सक्रीय तर केली गेली पण त्यामुळे देशभरामधले उद्योगधंदे व्यापार ठप्प झाले. मनोरंजन क्षेत्रही यापासून दूर राहू शकले नाही. शुटिंग्ज बंद झाल्याने अनेक कलाकार तंत्रज्ञ यांना घरी बसावे लागले.

अखेर जुलै पासून सरकारने मालिकांची शुटिंग्ज सुरु करायला मंजूरी तर दिली मात्र त्यातही सरकारतर्फे अनेक बंधनं घातली गेलीत. ज्यात महत्वाची अट आहे ६५ वर्षावरील ज्येष्ठ कलाकारांना शुटिंगच्या सेटवर प्रवेश वर्ज करण्यात आलाय. सुरुवातीला जेष्ठ कलाकारांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने सर्वांनी ती मान्य ही केली.

 पण आणखी किती दिवस हे बंधन असणार यावर मात्र कोणीच काहीच बोलत नाही आहे. ही अट फक्त त्या कलाकारांसाठीच नाही तर अनेक मालिकांसाठी आणि निर्मात्यांसाठी अडचणीची ठरतेय. कारण सध्याच्या कौटुंबिक मालिकांच्या भाऊगर्दीमध्ये अशा ज्येष्ठ कलाकारांचं त्या त्या मालिकांमध्ये स्वतःचं स्थान आहे, त्यांच्या व्यक्तिरेखांना चाहत्यांची पसंती मिळत आलीये ज्यामुळे या कलाकारांचा स्वतःचा प्रेक्षकवर्गही आहे.  त्याच बरोबर अभिनय क्षेत्र हे अनेक कलाकरांचे उपजीविकेचे सुद्धा एकमेव साधन आहे आणि सध्या तेच बंद आहे.

याच पार्श्वभूमीवर अभिनेत्री रोहीणी हट्टंगडी यांनी या शासनाच्या अटीचा निषेध व्यक्त केलाय. ”सुरुवातीला मी घरातून शूट करण्याचा प्रयत्न केला पण त्या शूटला मजा आली नाही. आमची टीम माझी योग्य काळजी घ्यायला तयार आहे. मी सुद्धा सेटवर जाऊन काम करायला फिट आहे.

मुळात  ६५ वयावरील व्यक्तिंवरच हे बंधन कसे काय. ६४ वयाची व्यक्ती काम करु शकते असं असेल तर ६४ आणि ६५ या वयांमध्ये फरक तो काय असतो हे आम्हाला समजवावे शिवाय कलाकारांवरच ही बंधनं का म्हणजे मग ती व्यक्ती जर मनोरंजन क्षेत्राशिवाय दुसऱ्या कुठच्या क्षेत्रामध्ये काम करत असेल तर ती सुरक्षित आहे का हा ही प्रश्न आहेच की” अशा कठोर शब्दांमध्ये त्यांनी हा निषेध मांडला आहे.