‘हे’ पाच पदार्थ खा; आजारांना लांब पळवा!

हिवाळा. आरोग्याला अनुकूल काळ.थंडीच्या दिवसांत वेगवेगळे सण, मिष्टान्न भोजन आणि कुटुंबियांबरोबर गप्पागोष्टी करत छान वेळ घालवणे ही खूप छान गोष्ट असते. वेगवेगळी मिष्टान्ने खात असतानाच या ऋतूमध्ये आणखी एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे, ती म्हणजे आहारातून आरोग्य!

सर्दी, खोकला, तापासारखे आजारही या थंडीच्या काळात होऊ शकतात. अशा वेळी आपण विशेष काळजी घ्यायला हवी. तसेच या आजारांना लांब ठेवण्यासाठी अँटीऑक्सीडंट्सची गरज असते. ती मिळवण्यासाठी पाच पदार्थ खायलाच हवेत. ही फळे किंवा पदार्थ प्रतिकारशक्ती वाढवण्याचेही काम करतात.

आवळाः-

आवळ्यामध्ये क जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असते. इतके की आवळ्याला एका अर्थाने फळांचा राजाच म्हणायला हवे, इतका तो गुणकारी असतो. तो अनेक प्रकारच्या संसर्गांपासून आपल्याला लांब ठेवतो. याशिवाय केस, पचनसंस्था आणि डोळ्यांसाठी हा आवळा अतिशय उत्तम समजला जातो. उत्त आरोग्यासाठी रोज एक आवळा खावाच, असे म्हटले जाते.  ताजा आवळा मिळत असेल तर चांगलेच, पण तो मिळत नसेल तर आळा कँडी, आवळ्याचे लोणचे, रस, च्यवनप्राश, सरबत, मुरंबा अशा अनेक पदार्थांतून आपण तो वर्षभर खाऊ शकतो.

ऊसः-

ऊस गोड लागतो. तसेच तो यकृतासाठी खूप छान असतो. दात आणि त्वचेसाठीही त्याचा उपयोग होतो. थंडीच्या दिवसांत मुबलक प्रमाणात ऊस मिळतो. त्याचा खाण्यात अवश्य समावेश करावा.

चिंचः-

आंबड-गोड चिंच सर्वांनाच खूप आवडते. लहानपणी चिंचा पाडून त्या खाण्यातला आनंद काही औरच असतो. पण कोणत्याही वयातील लोकांनी चिंचा अवश्य खाव्यात. चिंच मॅग्नेशियम, लोह, क जीवनसत्त्व अशा अनेक गुणधर्मांनी युक्त आहे. त्यामुळे ती खावीच. शिवाय, चिंच अन्न पचनासही चांगली असते. तुम्ही नुसती चिंच खाऊ शकत नसाल तर काही भाज्यांमध्ये, सांबारामध्ये घालून किंवा चटणीमध्ये घालून चिंच खाऊ शकता.

तीळः

खारट आणि गोड पदार्थ खाण्यात अधिक प्रमाणात असल्यास त्या पदार्थांत तीळ घातले जातात. तीळ आरोग्याचे संतुलन राखण्यास मदत करतात.

बोरः-

बोर हे फळ प्रतिकारशक्ती वाढवण्याचे काम करते. विशेषतः मुलांसाठी ते उपयुक्त आहे. याच्या वेगळ्या स्वादामुळे जिभेचा स्वाद वाढतोच; पण आपली भूकही त्यामुळे वाढते.