Site icon Krishi Pandhari | कृषी पंढरी

माजी बॅडमिंटनपटू नंदू नाटेकर कालवश

मुंबई, दि. 28 : बॅडमिंटनला राजमान्यता-लोकमान्यता मिळवून देणारे आणि बॅडमिंटनमध्ये 1956 मध्ये भारताला पहिले आंतरराष्ट्रीय विजेतेपद मिळवून देणारे, पदकांची शंभरी गाठलेल्या नंदू नाटेकर ( 88 ) यांचे आज वृद्धापकाळाने निधन झाले.  महाराष्ट्राचे सुपुत्र आणि बॅडमिंटन क्षेत्रात भारताचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर नेणारे अर्जुन पुरस्कार विजेते माजी बॅडमिंटनपटू नंदू नाटेकर यांचे भारतीय क्रीडाविश्वात वेगळे स्थान असून त्यांचे यश कित्येक खेळाडूंना प्रेरणा देणारे आहे. त्यांच्या निधनाने क्रीडा विश्वावर शोककळा पसरली आहे.

बहारदार खेळाबद्दल त्यांना सहा राष्ट्रीय पदके देखील मिळाली होती. त्यांनी वयाच्या 20 व्या वर्षी म्हणजेच 1953 मध्ये भारताचे प्रतिनिधीत्व केले.  नाटेकर यांनी बॅडमिंटनमध्ये  मिळवलेले यश हे औपचारिक प्रशिक्षणाशिवाय स्वकष्टावर  मिळवलेलं यश होतं. असे असले तरी ते अनेक उदयोन्मुख खेळाडूंसाठी मार्गदर्शक, प्रेरणास्त्रोत होते. त्यांनी आपल्या बहारदार खेळाने बॅटमिंटन रसिकांना आनंद दिला. 1980 आणि 1981 मध्ये दुहेरी पदक जिंकले. 1951 ते 1963 दरम्यान झालेल्या 16 एकेरी सामन्यांपैकी 12 आणि डबल्समध्ये 16 पैकी 8 पदके त्यांनी जिंकले. थॉमस चषक स्पर्धेत ते भारतीय संघाचे सदस्य होते.

नंदू नाटेकरांचे भारतीय क्रीडाविश्वात वेगळे स्थान असून त्यांचे यश कित्येक खेळाडूंना प्रेरणा देणारे आहे. आंतरराष्ट्रीय क्रीडा क्षेत्रात महाराष्ट्राचा लौकिक नंदू नाटेकर यांनी उंचावला. त्यांच्या कामगिरीमुळे क्रीडा क्षेत्राला झळाळी मिळाली. तरूणांना या क्षेत्रात येण्यासाठी प्रेरणा मिळाली. होतकरू खेळाडूंसाठी ते आदर्श ठरले. नाटेकर यांचे क्रीडा क्षेत्रातील योगदान महाराष्ट्राच्या चिरंतन स्मरणात राहील.  बॅडमिंटनपटू नंदू नाटेकर यांनी बॅडमिंटनला देशात लोकप्रियता मिळवून दिली. भारतीय बॅडमिंटनची आंतरराष्ट्रीय ओळख निर्माण केली. भारतीय खेळाडू आज आंतरराष्ट्रीय पातळीवर मिळवित असलेले यश नंदू नाटेकर यांनी त्याकाळात रचलेल्या भक्कम पायावर उभे आहे. त्यांच्या निधनामुळे क्रीडाक्षेत्रातील मार्गदर्शक असं व्यक्तिमत्त्व हरपले आहे.

Exit mobile version