ज्येष्ठ दिग्दर्शिका सुमित्रा भावे काळाच्या पडद्याआड

मुंबई, दि. 19 : “ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या आणि चित्रपट दिग्दर्शिका सुमित्रा भावे आज सकाळी पुण्यात निधन झालं. त्या ७८ वर्षांच्या होत्या. त्या बऱ्याच काळापासून आजारी होत्या.  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ज्येष्ठ दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांना श्रद्धांजली वाहिली. ते म्हणाले, ”सुमित्रा भावे यांनी सामाजिक कार्यकर्ती आणि संवेदनशील दिग्दर्शिका म्हणून केलेले काम या दोन्ही क्षेत्रासाठी यापुढेही मार्गदर्शक ठरेल. त्यांच्या निधनामुळे या दोन्ही क्षेत्रांना जोडणारा दुवा निखळला आहे.”

सुमित्राताई  यांच्या  निधनाने आशयघन चित्रपटांद्वारे सामाजिक प्रश्नांवर अचूक भाष्य करणाऱ्या अष्टपैलू कलावंत, संवेदनशील व्यक्तिमत्वाला आपण मुकलो आहोत. राष्ट्र सेवा दलाच्या संस्कारात वाढलेल्या, वंचित, उपेक्षित घटकांच्या कल्याणासाठी कार्य करणाऱ्या सुमित्राताईंनी महाराष्ट्रातील सामाजिक सुधारणांची चळवळ पुढे नेण्याचा प्रयत्न केला. चित्रपटनिर्मितीच्या क्षेत्रात स्वतंत्र स्थान निर्माण केलं. अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पुरस्कारांच्या मानकरी असलेल्या सुमित्राताईंनी महाराष्ट्राचं सांस्कृतिक विश्व समृद्ध करण्यात योगदान दिलं. त्यांचं निधन महाराष्ट्राच्या सामाजिक व सांस्कृतिक चळवळीची मोठी हानी  आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.” अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना आदरांजली वाहिली.