Site icon Krishi Pandhari | कृषी पंढरी

शेतकरी मैत्रिणींनो; तुमच्या शेतात पिकणाऱ्या मटारचा असाही होतो वापर..

मटार बाजारात येतात तेव्हा तुम्ही त्यापासून वेगवेगळे पदार्थ करता. मटारचे पदार्थ सर्वांनाच खूप आवडतात, पण मटारचा वापर करून तुम्ही केस आणि त्वचेची गुणवत्ता वाढवू शकता. तुमचे सौंदर्यही त्याआधारे खुलवू शकता. त्यासाठी खालील टीप्स पाहा.

वाटाणे किंवा मटार हे पोषक तत्त्वांनी युक्त असतात. तसेच ते आपल्या शरीराला अनेक आजारांपासून वाचवण्यास मदत करतात. त्वचा निरोगी राहण्यासाठीही मटारच्या कोवळ्या दाण्यांचा तेवढाच उपयोग
होतो. मटारपासून फेस पॅक आणि हेअर मास्क आपण घरच्या घरी तयार करू शकतो आणि त्या माध्यमातून केस आणि त्वचा उजळवू शकतो. आता पाहूया घरच्या घरी कसा फेस मास्क तयार करतात ते!

१. मटार-मध फेस मास्क

साहित्य: दोन चमचे उकडलेले मटार, एक टीस्पून मध, एक टीस्पून दही, चतुर्थांश टीस्पून हळद.
कृती : एका बाऊलमध्ये सर्व पदार्थ घेऊन त्याचे चांगले मिश्रण तयार करा. ते मिश्रण चेहरा व मानेवर लावा. हा फेसपॅक वाळल्यावरच कोमट पाण्याने धुवा. आठवड्यातून एकदा हा मास्क लावल्यास त्वचा सुंदर होईल.

२. मटार-ग्रीन टी हेअर मास्क
हा मास्क केसांचा पोत सुधारण्यासाठी वापरतात.
साहित्य : एक कप मटर दाणे, दोन टेबलस्पून ग्रीन टी

कृतीः मिक्सरमध्ये मटारदाणे आणि ग्रीन टी बारीक करून घ्या. केस धुऊन केस स्वच्छ करा. त्यानंतर हा लेप किंवा पॅक टाळूला आणि केसांना व्यवस्थित लावा. अर्ध्या तासानंतर डोके धुऊन टाका.
निरोगी आणि सुंदर केसांसाठी हा पॅक आठवड्यातून दोनदा वापरा.

3. वाटाणा-पपई फेस मास्क

साहित्य: एक वाटी मटार, पपईचे ८ तुकडे, थोडेसे गुलाबपाणी
कृतीः मटार आणि पपई मिक्सरमध्ये बारीक करून एका भांड्यात काढा.
या मिश्रणात गुलाबजल मिसळून चेहऱ्याला लावा आणि कोरडे झाल्यावर कोमट पाण्याने धुवा.
आठवड्यातून दोनदा चेहऱ्याला लावल्यास त्वचा तजेलदार होईल.

४ मटार–दुधाचा फेस मास्क

साहित्य: वाटाणे, २ चमचे कच्चे दूध

कृतीः मटार आणि दूध मिक्सरमध्ये बारीक करून त्याची पेस्ट करा. पेस्ट चेहऱ्यावर चांगली लावा आणि कोरडे झाल्यानंतर कोमट पाण्याने धुवा. काही दिवसातच फरक दिसून येईल.

कोणताही पॅक किंवा मास्क वापरण्यातील फरक केवळ तुम्ही नियमितपणे वापरता तेव्हाच दिसून येतो.

Exit mobile version