रोज खा दही..; रक्तदाब नियंत्रणात ठेवा

रोज दह्याचे सेवन केल्यास उच्च रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत होते. एका आंतरराष्ट्रीय अभ्यासात हा निष्कर्ष समोर आला आहे. युनिव्हर्सिटी ऑफ साउथ ऑस्ट्रेलियाने मेन युनिव्हर्सिटीच्या जोडीने हा अभ्यास केला होता, ज्याचे निष्कर्ष इंटरनॅशनल डेअरी जर्नलमध्ये प्रकाशित झाले आहेत.
दोन्ही विद्यापीठांच्या संशोधकांनी रक्तदाब आणि हृदय व रक्तवाहिन्यासंबंधीच्या धोका पोहोचविणाऱ्या घटकांमधील आणि दह्याचे सेवनातील संबंधांची तपासणी केली. ज्यामध्ये संशोधकांना असे आढळून आले की उच्च रक्तदाब असलेल्या लोकांनी रोज दही खाल्ले तर ते रक्तदाब कमी करण्यास उपयुक्त आहे.

हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकसारख्या रोगांचा धोका –
संशोधकांच्या म्हणण्यानुसार, जागतिक स्तरावर, एक अब्जाहून अधिक लोक उच्च रक्तदाबाने ग्रस्त आहेत, ज्यामुळे त्यांना हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकसारख्या रोगांचा (CVDs) धोका जास्त असतो. त्यातही कर्दिओ व्हासकुलर डिसीज अर्थातच हृदय रक्तवाहिन्या संबधी (cvd) आजार हे जगभरातील मृत्यूचे प्रमुख कारण आहे. अमेरिकेत दर 36 सेकंदाला एका व्यक्तीचा CVD मुळे मृत्यू होतो. ऑस्ट्रेलियामध्ये ते दर 12 मिनिटांनी होते. संशोधक डॉ. अलेक्झांड्रा वेड यांनी सांगितले की, या अभ्यासातून नवीन पुरावे मिळाले आहेत. त्यानुसार उच्च रक्तदाब असलेल्या लोकांचा रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी दही उपयुक्त ठरू शकते.

दही सेवनाचे अधिक फायदे-
दही खाण्याचा हा अभ्यास 915 लोकांवर करण्यात आला. अभ्यासात असे आढळून आले की, जे लोक नियमितपणे दही खातात, त्यांचा रक्तदाब दही न खाणाऱ्या लोकांपेक्षा सुमारे सात पॉइंटने कमी होता. दह्याचे संभाव्य फायदे तपासण्यासाठी, तसेच जोखीम असलेल्या व्यक्तींवर लक्ष केंद्रित करणे सुरू ठेवण्यासाठी भविष्यातील निरीक्षण आणि अभ्यास आवश्यक आहेत, असे संशोधकांनी सांगितले.

पोषक तत्वांनी समृद्ध दही-
उच्च रक्तदाब हा हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोगाचा क्रमांक एकचा शत्रू आहे. त्यामुळे तो कमी करण्यासाठी आणि नियंत्रित करण्याचे मार्ग शोधत राहणे महत्त्वाचे आहे. दुग्धजन्य पदार्थ, विशेषतः दही, रक्तदाब कमी करण्यास सक्षम असू शकतात, असेही संशोधक सांगतात. दुग्धजन्य पदार्थांमध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि पोटॅशियमसह अनेक सूक्ष्म पोषक घटक असतात, जे रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करतात. त्यातही दही अधिक प्रभावी आहे कारण त्यात बॅक्टेरिया देखील असतात, ज्यामुळे रक्तदाब कमी होतो, असे निरीक्षण संशोधक नोंदवितात.