सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय, भारत सरकार आणि माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, महाराष्ट्र शासन, यांची संयुक्त निर्मिती असलेल्या ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर : द अनटोल्ड ट्रुथ’ या चित्रपटाचे प्रसारण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून रविवार दि. 6 डिसेंबर 2020 रोजी दुपारी 1.30 वा. होणार आहे.
६ डिसेंबरला किरकोळ मद्य विक्रीच्या अनुज्ञप्ती बंद
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 64 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबई शहर परिसरात मद्य विक्रीच्या किरकोळ अनुज्ञप्त्या बंद असल्याची माहिती मुंबई शहर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राजीव निवतकर यांनी दिली आहे.
मुंबई शहर जिल्ह्यातील दादर, शिवाजी पार्क, माहिम, धारावी, सायन, करी रोड स्टेशनपर्यंतचा सर्व भाग, वरळी सी फेस, वरळी कोळीवाडा ते संगम नगरपर्यंत हद्दीमधील भागात स्थित असणाऱ्या तसेच सायन कोळीवाडा, किंग्ज सर्कल, ॲन्टॉपहिल, वडाळा, शिवडी, काळाचौकी, भोईवाडा पर्यंत हद्दीमधील सर्व किरकोळ मद्य विक्रीच्या अनुज्ञप्त्या पूर्णत: बंद ठेवण्यात येणार आहे. आदेशाचे उल्लंघन करुत मद्य विक्री करीत असल्याचे आढळून आल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल असे आदेशात नमूद आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणदिनी घरातूनच अभिवादन करा
मुंबई, दि. ५ : आधुनिक भारताच्या जडणघडणीमध्ये ज्या थोर महापुरुषांनी योगदान दिले आहे त्यात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव अग्रक्रमाने घ्यायला हवे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे चतुरस्र् व्यक्तिमत्त्व असून आपल्या सर्वांसाठी सदैव स्फूर्तीदायक व दिशादर्शक आहेत. भारताच्या सर्वांगिण विकासासाठी लोकशाहीप्रणित भारतीय संविधान निर्माण करून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्यावर कधीही न फिटणारे उपकार असल्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले. सद्याची कोविड-१९ परिस्थिती पाहता महापरिनिर्वाणदिनी जनतेने घरूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करावे, असे आवाहन श्री. भुजबळ यांनी केले.
सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, धार्मिक व इतर विविध क्षेत्रात अतुलनीय मौलिक कार्य करून बाबासाहेबांनी आपले खरे राष्ट्रप्रेम दाखवून दिले. दरवर्षी लाखो अनुयायी त्यांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर येत असतात पण ह्यावर्षी कोविड-१९ च्या संकटामुळे चैत्यभूमीवर न येता प्रत्येकाने घरूनच दर्शन घ्यावे.
महापरिनिर्वाणदिनी चैत्यभूमीवरील मानवंदना, अभिवादन आणि दर्शनाचे थेट प्रक्षेपण, विविध माध्यमातून ऑनलाइन दर्शन, स्मारकावर हेलिकॉप्टरद्वारे पृष्पवृष्टी यांसह विविध सुविधेचे नियोजन राज्य सरकार आणि महापालिका असून त्यामुळे जनतेने घरातूनच बाबासाहेबांना अभिवादन करावे, असेही श्री. भुजबळ यांनी सांगितले.