सर्दी पडशाचा त्रास; अशी करा त्यावर मात

सध्या राज्यात थंडीला सुरूवात झालेली आहे. त्यातच काही ठिकाणी ढगाळ हवामान आणि पावसाची शक्यता वर्तविली आहे. या सर्व स्थितीत ज्यांना हवामान बदलाचे त्रास होतात, त्यांच्यासाठी मात्र त्रासदायक प्रकार होऊ शकतो. अनेकांना या हवामान बदलाने किंवा थंडीच्या चाहुलीने सर्दी-पडशाची तक्रार होऊ शकते. सर्दी-पडसे ही अगदी सामान्य तक्रार आहे. सर्व वयाच्या, सर्व प्रकारच्या व्यक्तींना सर्दी होऊ शकते. त्यावरील उपाय आपण पाहू यात.

का होते सर्दी पडसं?

सर्दी-पडसे एका जातीच्या विषाणूंमुळे होते. हे विषाणू एकापासून श्वासावाटे दुस-याकडे सहज पसरतात. एक-दोन दिवसांत त्यालाही सर्दी सुरू होऊ शकते. या विषाणूंविरूध्द थोडीफार प्रतिकारशक्ती तयार झाली तरी ती अल्पजीवी असते म्हणून, त्याच व्यक्तीला पुन्हापुन्हा सर्दी होऊ शकते. सर्दीच्या पहिल्या दोन तीन दिवसांत नाकातले पाणी पांढरे आणि पातळ असते. नंतर हळूहळू ते घट्ट होत जाते. कधीकधी नंतर होणारा जंतुदोष (जिवाणू) हे या घट्टपणाचे कारण असते. सर्दी-पडशात बारीक ताप येतो. डोके जड होते व दुखते. डोळयातून सारखे पाणी येते. वावडयाच्या सर्दीमध्ये खूप शिंका येतात. नाकातून पाणी गळते. नाक व डोळे यांना खाज येते. सर्वसाधारणपणे सर्दी एका आठवडयात पूर्णपणे बरी होते.

असे करता येतील उपाय

उपचारडोकेदुखीवर ऍस्पिरिन किंवा पॅमाल घेण्यापलीकडे विशेष उपचाराची गरज पडत नाही. सीपीएम गोळीने वावडयाची सर्दी कमी व्हायला मदत होते. मात्र या गोळीमुळे गुंगी व झोप येते. पण शरीराला थोडा व्यायाम दिला तरीही नाक आपोआप मोकळे होते. अजून विषाणूंवर कोणतेही परिणामकारक औषध नसल्याने विषाणूसर्दी ‘बरी’होण्यासाठी कसलेही औषध नाही. जाहिरातीत अनेक प्रकारच्या गोळया असल्या तरी सर्दी बरी करणारे औषध त्यात नसते. त्यात फक्त डोकेदुखीसाठी ऍस्पिरिन मात्र असते.’विक्स’, ‘रबेक्स’ या मलमांमध्ये असलेल्या पाच घटकांपैकी फक्त एक घटक मेंथॉल उपयोगी ठरू शकतो. तोही फक्त चोंदलेले नाक मोकळे करण्यासाठी. बाकी सर्व निरुपयोगी मालमसाला! कसलेही औषध घेतले तरी सर्दी बरी व्हायला आठवडाभर लागू शकतो. सदीर्चा त्रास वारंवार होत असल्यास कानाघ तज्ज्ञाकडून अंतर्गत तपासणी करून घ्यावी.

आयुर्वेदाचाही करा वापर
काही लोकांना रात्री झोपण्यापूर्वी खूप पाणी पिण्याची सवय असते, यामुळेही सर्दी-पडसे होऊ शकते. थंडी, पावसाळा संपून ऊन तापू लागताना ब-याचजणांना सर्दी होते. ही सर्दी थांबवण्याचा प्रयत्न करू नये; वाहू द्यावी, म्हणजे श्वसनसंस्थेचे इतर भाग (श्वासनळी, फुप्फुसे) निरोगी राहतात. अशी सर्दी औषधांनी दाबण्याचा प्रयत्न केल्यास श्वसनसंस्थेच्या खालच्या भागात स्राव सुरू होतात असा आयुवेर्दाचा अनुभव आहे. म्हणूनच नाकातून सर्दी वाहून जाऊ देणे महत्त्वाचे आहे. सर्दीवर नागगुटी किंवा त्रिभुवनकिर्ती या औषधांच्या 2-2 गोळया दिवसातून 3 वेळा याप्रमाणे 3 दिवस द्या. मसालेदार व तिखट पदार्थ खाल्ल्यामुळे श्वसनसंस्थेत पाझर वाढून नाक लवकर मोकळे होते असा अनुभव आहे. या गुणांचा उपयोग करून तिखटाने सर्दीवर थोडा आराम मिळू शकतो.

जलनेतिचा उपाय
सतत व वारंवार सदीर्साठी हा उपाय करुन पाहावा. नाकातून स्राव वाहून जाण्यास मदत व्हावी म्हणून कोमट मीठपाण्याने नाकाच्या अंतभार्गाची स्वच्छता करावी. या क्रियेला जलनेति म्हणतात. यासाठी मीठ मिसळून अश्रूंच्या चवीचे सुमारे अर्धा लिटर कोमट खारट पाणी तयार करावे. हे पाणी आधी ‘चालू’ असलेल्या नाकपुडीतून हळूहळू सोडावे. तोंडाने श्वासोच्छ्वास चालू ठेवावा म्हणजे हे पाणी घशात उतरत नाही. ते आपोआप दुस-या नाकपुडीतून वाहते. यानंतर हाच प्रयोग दुस-या नाकपुडीतून करावा. नाकाचा अंतर्भाग, पोकळया, सायनस पोकळयांची तोंडे या क्रियेने स्वच्छ व मोकळी होतात. यामुळे घाण बाहेर पडायला मदत होते. मिठाचे प्रमाण अश्रूंच्या चवीपेक्षा कमी किंवा जास्त झाले असेल तर या पाण्याने नाक चरचरते. शुध्दीक्रिया झाल्यानंतर एकेक नाकपुडी हलकेच शिंकरून साफ करावी. वाकून उभे राहिल्यावर घशात न जाता पाणी सहज बाहेर पडते.

नाकात गाईच्या किंवा म्हशीच्या पातळ तुपाचे एक-दोन थेंब टाकावेत. मानेच्या अशा अवस्थेत नाकात टाकलेले थेंब घशात उतरत नाहीत. यासाठी वचादि तेल किंवा खोबरेल तेलही चालते. अणुतैल औषधांचे थेंब नाकात टाकण्याने वारंवार होणारा सदीर्चा त्रास आटोक्यात राहतो. वेखंडयुक्त तेलाचे थेंबही यासाठी चांगले.