Site icon Krishi Pandhari | कृषी पंढरी

कारच्या किमती वाढवण्याची घोषणा

मारुती सुझुकी, ऑडी आणि मर्सिडीज-बेंझ इंडियाने भारतात त्यांच्या कारच्या किमती वाढवण्याची घोषणा केली आहे. या कंपन्यांशिवाय इतर कंपन्याही येत्या काही दिवसांत किमती वाढवू शकतात.

मारुती सुझुकीने सांगितले की, ‘गेल्या एका वर्षात विविध उत्पादन खर्चात वाढ झाल्यामुळे कंपनीच्या वाहनांच्या किमतीवर विपरीत परिणाम झाला आहे. त्यामुळे, कंपनीने या अतिरिक्त खर्चातील काही बोजा दरवाढीद्वारे ग्राहकांवर टाकणे अत्यावश्यक झाले आहे. कंपनीने वेगवेगळ्या मॉडेल्सच्या किमतींमध्ये सातत्याने वाढ केली आहे. कंपनीने या वर्षी मार्च, जुलै आणि सप्टेंबरमध्ये दरवाढीची घोषणा केली होती.
मारुती सुझुकीने अलीकडेच आपल्या व्हॅन Eeco ची किंमत 8,000 रुपयांनी वाढवली आहे. इकोमध्ये एअरबॅग जोडल्यामुळे ही वाढ झाली आहे. तसेच, मारुती सुझुकीने अलीकडेच म्हटले होते की डिसेंबरमध्ये त्यांच्या दोन कारखान्यात सेमी कंडक्टरच्या कमतरतेमुळे उत्पादन 80-85 टक्केच होत आहे.

मर्सिडीज-बेंझ इंडिया
जर्मन लक्झरी कार निर्माता मर्सिडीज-बेंझ इंडियाने सांगितले की ते 1 जानेवारी 2022 पासून निवडक मॉडेल्सच्या किमती दोन टक्क्यांपर्यंत वाढवतील. तथापि, कंपनीने सांगितले की, ज्या ग्राहकांनी त्यांच्या कारचे बुकिंग केले आहे आणि निवडक मॉडेल्ससाठी 4 महिन्यांहून अधिक काळ वाट पाहत आहेत, त्यांना वाढलेले दर लागू होणार नाहीत. २ टक्क्यांपर्यंतची वाढ १ जानेवारी २०२२ पासून लागू होईल. याशिवाय, ए-क्लास, जीएलए आणि ई-क्लास सारख्या निवडक मॉडेल्ससाठी 31 डिसेंबर 2021 पर्यंत किंमत संरक्षण लागू असेल.

ऑडीनेही किंमत वाढविली
जर्मन लक्झरी कार मेकर ऑडीनेही गुरुवारी पुढील वर्षी 1 जानेवारीपासून संपूर्ण मॉडेल श्रेणीत 3 टक्क्यांपर्यंत दरवाढ जाहीर केली. त्यासाठी कंपनीने उत्पादन खर्च वाढीचे कारण दिले आहे. कंपनी सध्या A4, A6, A8 L, Q2, Q5, Q8, S5 Sportback, RS 5 Sportback, RS 7, RS Q8, e-tron 50, e-tron 55, e-tron Sportback 55, e-tron GT कार तयार करते.

Exit mobile version