सध्या लहान मुलांमध्ये जाडीचे प्रमाण वाढले आहे. लहान वयात मुलं गुटगुटीत असतात पण आता बाळसं जाऊन त्याची जागा जाडेपणाने घेतली आहे. कारण मुलं कसेही कोणताही पदार्थ खातात. पालकही अनेकदा कौतुकापोटी पुरवतात पण यामुळे मुलांना मोठे झाल्यावर त्रास होऊ शकतो. मुलांचा आहार मयादित ठेवा. भूक असेल तेवढेच खायला द्या. खाण्याची जबरदस्ती करणे म्हणजे जाडीला आमंत्रण देण्यासारखे आहे.मुलांच्या खाण्याच्या वेळा नक्की करा. यात अनियमितता असल्यास जाडी वाढते. पुढील गोष्टींकडे लक्ष द्या
१.मुलांना सुरुवातीपासूनच घास चावून चावून खाण्याची सवय लावा. काही मुलं घास लगेच लगेच गिळतात ज्यामुळे पचन होत नाही.
२.मुलांच्या जाडीची इतरांशी तुलना करू नका. ते यामुळे अस्वस्थ होतील अशा प्रतिक्रिया देऊ नका. अशा प्रतिक्रियांमुळे त्यांना वाईट वाटेलच पण त्याचा काही विपरीत परिणाम देखील होऊ शकतो.
३.सुरुवातीपासूनच मुलांना व्यायामाची सवय लावा ,त्यांना सायकल वापरायला द्या. कुठेही जायचं म्हणजे गाडी न्यावी असं नाही. काही जवळची ठिकाण असतील तर सायकल हा उत्तम मार्ग. सायकल नसेल तर ही छोटी मोठी कामं चालत जाऊन करण्याची सवय लावा.
४. मुलांच्या खाण्यामध्ये चॉकलेट, बिस्कीट, टॉफी इत्यादीचं प्रमाण मर्यादित ठेवा. बाहेरचे पदार्थ त्यांना फार वेळा खायला देऊ नका.
५. मुलांना सकस नाश्ता करायची आणि सगळ्या भाज्या खायची सवय लहान असल्यापासूनच लावा. ज्यामुळे बाहेरचे पदार्थ खाण्याकडे त्यांचा कल कमी असेल.