तामिळनाडू, कर्नाटक, महाराष्ट्र, तेलंगणा आणि हरियाणा या राज्यांना सन 2020-2021 यावर्षासाठी 14.09लाख मेट्रिक टन डाळी आणि तेलबियांच्या खरेदीसाठी मान्यता
खरीप 2020-2021 च्या हंगामातल्या धान्यांची आवक आता बाजारपेठेत सुरू झाली आहे. सरकारने खरीप 2020-2021 हंगामातल्या धान्याची खरेदी पूर्वीप्रमाणेच किमान आधार दराने करीत आहे. किमान आधार दराने शेतक-यांच्या धान्याची खरेदी करण्याची सरकारचे धोरण हे पहिल्याप्रमाणेच यंदाही कायम आहे.
ज्या राज्यांचे प्रस्ताव आले आहेत, त्यांच्या आधारे तामिळनाडू, कर्नाटक, महाराष्ट्र, तेलंगणा आणि हरियाणा या राज्यांना किमान आधार दरानुसार धान्य खरेदीची करण्यास मान्यताही देण्यात आली आहे. त्यामुळे या राज्यांनी सन 2020-2021 साठी आत्तापर्यंत 14.09 लाख मेट्रिक टन डाळी आणि तेलबियांची खरेदी किमान आधार दराने केली आहे. अन्य राज्यांनी आणि केंद्रशासित प्रदेशंाकडून खरीप डाळी आणि तेलबियांच्या खरेदीचे प्रस्ताव आले, तर त्याला मान्यता देण्यात येणार आहे. या अधिसूचित हंगामानंतरच्या कालावधीमध्ये डाळी आणि तेलबियांचे बाजार भाव किमान आधार दरापेक्षाही कमी झाले तर किंमत समर्थन योजनेनुसार (पीएसएस) नुसार खरेदी करण्यात येणार आहे.
सरकारने नोडल एजन्सीच्या माध्यमातून दि. 28.09.2020 पर्यंत 33 लाख रुपये मूल्याच्या 46.35 मेट्रिक टन मुगडाळीची खरेदी केली आहे. याचा लाभ तामिळनाडूतल्या 48 शेतक-यांना झाला आहे. त्याचप्रमाणे 5089 मेट्रिक टन खोब-याची खरेदी केली. त्यासाठी सरकारने किमान आधार मूल्यानुसार 52.40 कोटी रुपये दिले. याचा तामिळनाडू आणि कर्नाटकातल्या 3961शेतकरी बांधवांना लाभ झाला आहे. कर्नाटक, आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि केरळ या राज्यांमधून 1.23 लाख मेट्रिक टन खोबरे खरेदी करण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे. त्यानुसार ही खरेदी करण्यात आली.
पंजाब आणि हरियाणामध्ये भात पिकाचा खरेदी विपणन हंगाम 2020-21 ला दि. 26 सप्टेंबर,2020 रोजी प्रारंभ झाला आहे. अवघ्या दोन दिवसात म्हणजेच दि. 28.09.2020 पर्यंत या हंगामात हरियाणामध्ये 3,164 मेट्रिक टन तर पंजाबात 13,256 मेट्रिक टन भाताची खरेदी झाली. या एकूण 16,240 मेट्रिक टन भाताची खरेदीसाठी किमान आधार मूल्यानुसार 31 कोटी रुपये देण्यात आले. उर्वरित राज्यांमध्ये भाताच्या खरेदीला नुकतीच म्हणजेच दि. 28.09.2020 पासून प्रारंभ झाला आहे.
सन 2021 च्या हंगामातली कापसाची खरेदी दि. 1.10.2020 पासून सुरू होणार आहे. भारतीय कपास महामंडळाच्यावतीने एफएक्यू ग्रेड कापसाची खरेदी दि. 1.10.2020 पासून सुरू केली जाणार आहे.