महाराष्ट्रात डाळिंब हे एक नगदी पीक बनले आहे. या फळपिकाखालील क्षेत्र दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. महाराष्ट्रातील डाळिंबास देशांतर्गत व परदेशी बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात मागणी आहे. महाराष्ट्रातील शेतकरी मोठ्या प्रमाणावर डाळिंब फळाची निर्यात करून परकीय चलन मिळवित आहेत. अजूनही डाळिंब पिकापासून जादा अर्थार्जन होऊ शकते. यासाठी डाळिंबाच्या काढणीनंतरच्या उत्पादन तंत्रातील व्यवस्थापनाकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
डाळिंबाची काढणी
डाळिंब झाडाला फुले लागण्यापासून फळे काढणीपर्यंत जातीपरत्वे १३० ते १७० दिवस लागतात. सद्यःस्थितीत मृगबहाराची फळे बाजारपेठेत पाठविण्यासाठी तयार होऊ लागली आहेत. ज्या भागात पाण्याची कमतरता असते अशा ठिकाणीच हा बहार घेतला जातो. फळांचा रंग गर्द तांबडा झाल्यास फळ काढणी करावी. पक्व वा काढणीसाठी तयार असणार्या फळाच्या शेंड्याकडील पाकळ्या कडक होऊन आत वळतात व फळांचा गोलसरपणा कमी होऊन ती चपट्या आकाराची होतात. पक्व फळांची साल नखाने टोचण्याइतकी मऊ होते. मृगबहारातील फळे काढणीसाठी आपणास सतत ५ ते ६ आठवडे लागतात. फळे जास्त काळ झाडावर ठेवल्यास फळातील दाणे काळे पडतात. डाळिंब फळांची काढणी सिकेटरच्या सहाय्याने १० सें. मी. देठ ठेवून करावी. फळ काढणी सकाळी अथवा सायंकाळी करावी.
फळांची प्रतवारी
आपल्या फळांना चांगला भाव मिळण्याच्या उद्देशाने फळांची प्रतवारी करणे अधिक फायद्याचे ठरते. बाजारपेठेत उत्तम प्रतीची फळे पाठविणे अत्यंत महत्त्वाचे असते. फळांची प्रतवारी करताना दबलेली, खरचटलेली, कीडग्रस्त फळे बाजूला काढून टाकावी. फळांची प्रतवारी आकारमान व रंग यावरून खालीलप्रमाणे करावी :
अ) सुपर साईज ः या प्रतवारीतील फळे सर्वात मोठी, आकर्षक, भडक रंगाची व ७५० ग्रॅमपेक्षा वजनाने जादा असावीत. फळे रोग किंवा कीडग्रस्त नसावीत.
ब) किंग साईज ः या प्रतवारीची फळे आकर्षक रंगाची, लाल भडक व ५०० ते ७५० ग्रॅम वजनाची असावीत.
क) क्वीन साईज ः डाग नसलेली, आकर्षक रंगाची, ४०० ते ५०० ग्रॅम वजनापर्यंतची असावीत.
ड) प्रिन्स साईज ः पक्व झालेली, आकर्षक रंगाची, ३०० ते ४०० ग्रॅम वजनापर्यंतची असावीत.
या चार प्रतींशिवाय उत्तर व दक्षिण भारतातील बाजारपेठेत डाळिंबाची फळे ‘१२ अ’ व ‘१२ ब’ या दोन प्रतीत विभागली जातात. २५० ते ३०० ग्रॅम वजनाचे, आकर्षक रंगाचे व एखादा डाग असलेले फळ ‘१२ अ’ मध्ये तर २५० ते ३०० ग्रॅम वजनाचे व काही प्रमाणात डागाळलेले फळ ‘१२ ब’ प्रतीत प्रतवारी करतात. याप्रमाणे शेतकर्यांनी फळांची प्रतवारी काळजीपूर्वक करणे फायद्याचे ठरते. प्रतवारी करणे हा एक सूक्ष्म निरीक्षणाचा भाग आहे.
फळाचे पॅकिंग
फळांच्या काढणीनंतरच्या व्यवस्थापनात पॅकिंगला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. फळांच्या पॅकिंगसाठी वापरल्या जाणार्या पुठ्ठ्यांंना ‘कोरूगेटेड फायबर बोर्ड बॉक्सेस’ म्हणतात. फळे दुसर्या बाजारपेठेत पाठविण्यासाठी पांढर्या रंगाची पाच घड्या असलेली पेटी वापरतात, तर तपकिरी रंगाची तीन घड्या असलेली पेटी स्थानिक अथवा जवळच्या बाजारपेठेसाठी वापरावी. फळांच्या आकारमानानुसार सुपर साईजची चार किंवा पाच, किंग साईजची सहा फळे, क्वीन साईजची नऊ फळे तर प्रिन्स किंवा ‘१२ अ’ व ‘१२ ब’ प्रतवारीची बारा फळे भरली जातात. फळे भरताना पेटीच्या तळाशी कागदाचे तुकडे टाकून त्यावर प्रतवारी केलेली फळे ठेवावीत. त्यावर नंतर लाल रंगाचा कागद टाकून फळे झाकावीत. हवा खेळती राहण्यासाठी या पेट्यांना छिद्रे असतात. अशा माल भरलेल्या १० ते १२ पेट्या एकावर एक रचून त्यांचा एक गठ्ठा तयार करावा. यालाच ‘पॅलेट्स’ असे म्हणतात व नंतर फळे बाजारपेठेत पाठवावीत.
फळांची निर्यात
फळे बाजारपेठेत पाठविण्यासाठी तयार पेट्या वातानुकूलित वा शीतगृहाची सोय असणार्या ट्रक वा रेल्वेद्वारे वॅगन्समधून केल्यास फळांची नासधूस टाळता येते. महाराष्ट्रातून मुख्यत्वे नोव्हेंबर ते मार्च या कालावधीत डाळिंबाची निर्यात दुबई, हॉंगकॉंग, कुवेत, अमेरिका, सिंगापूर, रशिया, संयुक्त अरब अमिराती, सौदी अरेबिया, इंग्लंड, इटली, श्रीलंका व बांगलादेश आदी देशांत केली जाते. भारतात एकूण उत्पादनाच्या ८ ते १० टक्के उत्पादनाची निर्यात होत असल्याने निर्यातीस भरपूर वाव आहे.
कृषी महाविद्यालय, बदनापूर, जि. जालना