देशांतर्गत उपलब्धता वाढवण्यासाठी आणि अत्यावश्यक अन्नपदार्थांच्या किमती स्थिर ठेवण्यासाठी आणखी एक ठोस उपाय म्हणून केंद्र सरकारने आज ‘मुक्त श्रेणी’ अंतर्गत तूर आणि उडीद डाळीची आयात 31 मार्च 2023 पर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय अधिसूचित केला.
या निर्णयामुळे येत्या आर्थिक वर्षात (2022-23) तूर आणि उडीद आयात धोरणाबाबतच्या अटकळींना पूर्णविराम मिळाला आहे आणि यातून स्थिर धोरणाचे संकेतही दिले आहेत ज्याचा सर्व संबंधितांना लाभ होईल. या उपायामुळे देशांतर्गत उपलब्धता वाढवण्यासाठी या डाळींची आयात सुनिश्चित होईल. या डाळींच्या पुरेशा उपलब्धतेमुळे ग्राहकांना परवडणाऱ्या किमतीत डाळी उपलब्ध होतील अशी अपेक्षा आहे.
सुरळीत आणि निर्बाध आयात सुनिश्चित करण्यासाठी सरकारने 15 मे 2021 पासून 31 ऑक्टोबर 2021 पर्यंत ‘मुक्त श्रेणी’ अंतर्गत तूर, उडीद आणि मूग आयात करण्यास परवानगी दिली होती. तूर आणि उडीद डाळीच्या आयाती संदर्भातील मुक्त श्रेणीची व्यवस्था त्यानंतर 31 मार्च 2022 पर्यंत वाढवण्यात आली. या धोरणात्मक उपायांना सुविधा उपायांद्वारे पाठबळ पुरवले जात असून संबंधित विभाग/संस्थेद्वारे अंमलबजावणीवर देखरेख केली जात आहे.
ग्राहक व्यवहार विभाग (DoCA) च्या अधिकृत आकडेवारीनुसार, 28.03.2022 रोजी नोंदवलेल्या तूर डाळीची अखिल भारतीय सरासरी किरकोळ किंमत 102.99 रुपये प्रति किलोग्राम आहे, जी 28.03.2021 रोजी 105.46 प्रति किलोग्रॅम होती , म्हणजेच 2.4% घसरण झाली आहे. 28.03.2022 रोजी नोंद झालेली उडीद डाळीची अखिल भारतीय सरासरी किरकोळ किंमत 104.3 रुपये प्रति किलोग्रॅम , जी 28.03.2021 रोजीच्या 108.22 रुपये प्रति किलोग्रॅमच्या तुलनेत 3.62% कमी आहे.