कृषी मूल्यवर्धन : बिस्किटे कशी बनवावी?

उद्योगाची परिपूर्ण माहिती नसल्यामुळे युवक उद्योग चालू करू शकत नाहीत. म्हणून या लेखामध्ये विविध प्रकारची बिस्किटे कशी बनवायची, याची सखोल माहिती तसेच यासाठी आवश्यक साधनसामग्री व अन्नप्रक्रिया उद्योगासाठीचे शासकीय कार्यालयांचे पत्ते माहितीस्तव देत आहोत. शेतकरी युवक व बचतगट असे उद्योग यशस्वी करू शकतील.

मलई बिस्किटे
साहित्य ः मैदा १ किलो, साखर अर्धा किलो, साईचे दही ४ वाट्या, बेकिंग पावडर ४ चमचे, अमोनिया १० ग्रॅम, सोडा १ चमचा, तूप २ वाट्या, व्हेनिला इसेन्स थोडासा.
कृती ः मैद्यात सोडा व बेकिंग पावडर घालून एकजीव होण्यासाठी मिसळून घ्यावे. साखर, दही, तूप व अमोनिया हे सर्व अन्नघटक एकत्र करून हाताने फेटून घ्यावे. नंतर त्यामध्ये वरील मिश्रण एकत्र करावे व भिजण्यासाठी एक रात्रभर ठेवावे. मिश्रण जर जास्त घट्ट वाटत असेल तर त्यामध्ये दूध घालावे. दुसर्‍या दिवशी वरील मिश्रणाची पोळी लाटावी व बिस्किटे कापून ओव्हनमध्ये भाजून घ्यावीत. तयार झालेली बिस्किटे चवीला रुचकर लागतील.

चॉकलेट कुकीज
साहित्य ः मैदा ३०० ग्रॅम, चॉकलेट २ कप, बारीक साखर २०० ग्रॅम, बटर २०० ग्रॅम, अंडे २ नग, व्हॅनिला इसेन्स थोडेसे
कृती ः ओव्हन चालू करून १९० डिग्री सेल्सिअस तापमानाला सेट करून ठेवा. बेकिंग ट्रेवर बटर लावून तयार ठेवावे. एका बाऊलमध्ये बटर व बारीक साखर फेटून घ्यावी. नंतर दुसर्‍या बाऊलमध्ये अंडी फेटून घ्यावीत व फेटलेले अंडे वरील बाऊलमध्ये घालावे. त्यामध्ये व्हॅनिला इसेन्स घालावा. नंतर मैदा चोळून घ्यावा व वरील मिश्रणात थोडा थोडा घालावा. चॉकलेटची लहान लहान तुकडे करून वरील मिश्रणात घालून एकत्र करावे. टेबल स्पूनच्या (चमच्या) सहाय्याने मिश्रणाचे गोळे बटर लावून तयार केलेल्या बेकिंग ट्रेमध्ये ठेवावेत; परंतु त्यामध्ये अंतर ठेवणे गरजेचे आहेे, कारण बेक झाल्यानंतर कुकीजची साईझ वाढते. लाकडी चमच्याने बेकिंग ट्रेमध्ये ठेवलेले कुकीजचे गोळे हलकेच दाबावेत. नंतर बेकिंग ट्रे ओव्हनमध्ये १९० डिग्री सेल्सिअस तापमानाला १५ मिनिटे ठेवा. कुकीज जास्त वेळ करू नयेत; कारण त्यामध्ये जास्त कडकपणा येतो. नंतर बेकिंग ट्रे बाहेर काढून ठेवा. थंड झाल्यानंतर कुकीज बरणीत भरून ठेवा व बरणी सील करा.

कोकोनट बिस्किटे
साहित्य ः मैदा २०० ग्रॅम, तूप १५० ग्रॅम, साखर १५० ग्रॅम, बेकिंग पावडर २ चमचे, ओला नारळ २०० ग्रॅम.
कृती ः मैदा व बेकिंग पावडर चाळून घ्या. तूप फेटून घ्यावे. चाळलेला मैदा व बेकिंग पावडर फेटलेल्या तुपात मिसळावे. ओल्या खोबर्‍याचा कीस करून घ्यावा व वरील मिश्रणात मिसळावा. नंतर त्यामध्ये साखर घालून मिश्रण एकजीव करावे. त्या मिश्रणाचे समान आकाराचे गोळे तयार करून बेकिंग ट्रेमध्ये ठेवावेत. ओव्हन चालू करून त्याचे तापमान १८० डिग्री सेल्सिअस ठेवावे. बेकिंग ट्रे २० ते २२ मिनिटे ओव्हनमध्ये ठेवावा. नंतर ट्रे बाहेर काढून बिस्किटे थंड होण्यासाठी ठेवावेत. बिस्किटे पूर्ण थंड झाल्यानंतर बाटलीमध्ये भरून ठेवावीत.

अन्नप्रक्रिया विभागाच्या योजनेसाठी संपर्काचे पत्ता
१. विभागीय प्रमुख, अपेडा, चौथा मजला, युनिट क्र. ३ व ४, बँकिंग कॉम्प्लेक्स, बिल्डिंग क्र. २, सेक्टर १९ अ, वाशी, नवी मुंबई. दू. क्र. – ०२२-२७८४०९४९
२. सी.एफ.टी.आर.आय. रिसोर्स सेंटर, मुंबई भवन कॉलेज परिसर, अंधेरी (प.), मुंबई ५८

– दादासाहेब खोगरे
कृषी विज्ञान केंद्र, सांगली