येत्या 21 जूनला येणाऱ्या आंतरराष्ट्रीय योगदिनाचे औचित्य साधत, उत्तम आरोग्य आणि निरामयतेसाठी योगाभ्यास हा लोकांच्या दैनंदिन आयुष्याचा भाग बनवण्यासाठी, योगाचा प्रचार-प्रसार करण्याचा उपक्रम केंद्रीय आयुष तसेच युवक व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने संयुक्तपणे हाती घेतला आहे. दोन्ही मंत्रालयाच्या समन्वयातून या निमित्त 2 मे 2021 रोजी एका आभासी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. जागतिक योग दिनाला 50 दिवस उरले असतांना या कार्यक्रमासोबतच योगदिनाची उलटगणती सुरु करण्यात आली आहे.
या कार्यक्रमात, क्रीडा मंत्री किरेन रिजीजू आणि विख्यात बॅडमिंटन प्रशिक्षक पुलेला गोपीचंद यांच्यात ‘खेळाडूंसाठी योगाचे महत्त्व’ या विषयावरील संवादाचे ध्वनीमुद्रित प्रसारणही करण्यात आले होते. प्रसिद्ध धावपटू अंजू बॉबी जॉर्ज, यांनीही योगाविषयी दिलेला संदेश यावेळी दाखवण्यात आला.
आयुष आणि क्रीडा तसेच युवक व्यवहार अशा दोन्ही मंत्रालयांच्या सोशल मिडीया प्लॅटफॉर्मवर हा कार्यक्रम दाखवण्यात आला होता, सुमारे 5000 हून अधिक लोकांनी हा कार्यक्रम पहिला. सध्या देशात कोविड रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेता, आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त एकत्र येऊन सार्वजनिक कार्यक्रम करणे योग्य ठरणार नाही. याचाच विचार करत, आंतरराष्ट्रीय योग दिनाचा प्रसार-प्रचार करणारे उपक्रम डिजिटल, आभासी आणि इलेक्ट्रोनिक स्वरूपात होत असून लोकांनी आपल्या घरातूनचा या उपक्रमात सहभागी व्हावे असे प्रोत्साहन दिले जात आहे. याच अनुषंगाने, आयुष मंत्रालयाने “योगासोबत रहा, मात्र घरीच रहा” असा संदेशही प्रसारित केला आहे.
कोविड-19 च्या दुसऱ्या लाटेत संसर्ग वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर, कोविडच्या शारीरिक आणि मानसिक परिणामांविषयी लोकांच्या मनात चिंता असल्याचे जाणवत आहे. त्यामुळे सध्याच्या या वातावरणात, योगाभ्यासाचे बहुआयामी लाभ अनेकांसाठी फारच उपयुक्त ठरत असल्याचे सिध्द होत आहे. योग हा केवळ शारीरिक व्यायाम नाही, तर त्यात संपूर्ण निरामय शरीर मनासाठी तसेच तणावमुक्त आयुष्यासाठी अनेक प्रभावी उपाययोजना असून रोज योगाभ्यास करणाऱ्यांना हे सगळे लाभ मिळत असतात. योगाभ्यासाच्या या आश्वासक आणि निरंतर मिळणाऱ्या लाभांच्या वैशिष्ट्यामुळे आज कोविडमुळे बदललेल्या जीवनशैलीतही दैनंदिन आयुष्यात तन-मनातच समतोल साधण्यासाठी योग उपयुक्त ठरू शकतो.
नियमित योगाभ्यासामुळे आरोग्य सुधारते आणि शरीराची नैसर्गिक रोगप्रतिकारशक्ती वाढते. योगाभ्यासामुळे शरीराची पचनशक्ती सुधारते, रक्तप्रवाह उत्तम राहतो आणि श्वसनाचे आजार, हृदयविकास, मधुमेह होण्याची शक्यता कमी होते. योगामुळे, मानसिक आरोग्य देखील सुधारते आणि भावनिकदृष्ट्या देखील संतुलित होण्यास मदत मिळते. यामुळे, भीती, अस्वस्थता, तणाव, कंटाळा, नैराश्य आणि चीडचिडेपणा अशा सगळ्या विकारांवर मात करता येते. विशेषतः सध्याच्या संकटकाळात अनेकांना या अवस्थांचा सामना करावा लागतो आहे, त्यावर योगाभ्यास प्रभावी उपाय ठरू शकतो. आणि म्हणूनच लोकांच्या विचारांमध्ये तसेच त्यांच्या दैनंदिन आयुष्यात योगाभ्यास पोहचवण्यासाठी आंतरराष्ट्रीय योग दिन, 2021 अत्यंत योग्य वेळी आलेला कार्यक्रम ठरणार आहे.
2 मे 2021 रोजी झालेल्या आभासी कार्यक्रमात आंतरराष्ट्रीय योग दिन, 2021 चा व्यापक प्रसार आणि जाहिरात करण्यात आली. या कार्यक्रमात अधिकाधिक संख्येने सहभागी होण्याचे आवाहन लोकांना करण्यात आले. गेल्या दोन वर्षांपासून योग दिन हा जागतिक स्तरावरचा निरोगी आयुष्यविषयक महत्वाची चळवळ ठरला आहे. अगदी नव्याने योग शिकणाऱ्या लोकांसाठी काही सामाईक योग प्रोटोकॉलविषयी या कार्यक्रमात चर्चा झाली. अधिकाधिक लोकांपर्यंत योगाचे हे नियम पोहोचवण्याची गरज यावेळी व्यक्त करण्यात आली.
सामाईक योग प्रोटोकॉल अंतर्गत, 45 मिनिटांच्या सत्रात, काही विशिष्ट योगासनांची निवड करण्यात आली आहे. भारतातील सुविख्यात अशा काही योग गुरुंनी 2015 साली या 45 मिनीटांच्या योगसत्राची आखणी केली होती. कोणत्याही वयाच्या, स्त्री-पुरुष दोन्ही अशा सर्वसामान्य माणसांना सहजपणे योगाभ्यास शिकता यावा या दृष्टीने, हे सत्र विकसित करण्यात आले आहे. सध्या शिकावू सत्रात किंवा ऑनलाईन वर्गाच्या माध्यमातूनही हे शिकणे शक्य आहे.
या ऑनलाईन कार्यक्रमात भारतातील अनेक योगतज्ञांनी सहभाग घेतला होता. यात बेंगळूरूच्या SVYASA विद्यापीठाचे कुलगुरू, डॉ एच आर नागेंद्र, लोणावळ्याच्या कैवल्यधाम संस्थेचे सरचिटणीस ओ पी तिवारी, चेन्नईच्या कृष्णमाचारी योग संस्थेचे योगाचार्य एस श्रीधरन, पुद्दुचेरीच्या योग विज्ञान महाविद्यालयाचे डॉ मदनमोहन आणि समन्वयक म्हणून बेंगळूरूच्या आर्ट ऑफ लिव्हिंग फाउंडेशनच्या कमलेश भरवाल यांचा समावेश होता.