‘जागतिक कर्करोग दिवस : वेळीच ओळखा कर्करोगाला

कर्करोगाविषयी जनजागृती करण्याकरिता ४ फेब्रुवारी हा दिवस जागतिक कर्करोग दिवस म्हणून साजरा केला जातो. कर्करोगाबाबत जनजागृती करणे, माहितीचा प्रसार करणे आणि कर्करोग प्रतिबंधात्मक उपाययोजनांना प्रोत्साहन देणे हे जागतिक कर्करोग दिवस साजरा करण्यामागील मुख्य उद्दिष्ट आहे.

कर्करोग हा एकच आजार नसून विविध रोगांचे मिश्रण आहे. कर्करोगाचे १०० पेक्षाही जास्त प्रकार आहेत. साधारणतः ज्या अवयवास अथवा ज्या प्रकारच्या पेशींना हा रोग होतो त्याचेच नाव कर्करोगाला दिले जाते.

अशी असतात लक्षणे-
छाती किंवा शरीराच्या इतर भागात गाठ जाणवणे. त्वचेवर नवीन तीळ उद्भवणे किंवा असलेल्या तिळात बदल होणे. बरी न होणारी जखम. आवाज बसणे किंवा खोकला बरा न होणे. पचनसंस्थेत किंवा लघवी होण्याच्या सवयींमध्ये बदल. खाल्ल्यानंतर अस्वस्थ वाटणे. गिळताना फार त्रास होणे. विनाकारण वजन वाढणे अथवा घटणे. अनैसर्गिक रक्त अथवा इतर स्त्राव होणे. फार थकल्यासारखे वाटणे.
बहुतेक वेळा ही लक्षणे थेट कर्करोगामुळे उद्भवत नाहीत. निरुपद्रवी ट्युमर वा इतर काही कारणांमुळेही अशी लक्षणे दिसू शकतात.
याबाबत फक्त डॉक्टरच खात्रीने सांगू शकतात. वरील लक्षणे दाखवणाऱ्या किंवा आरोग्य विषयक समस्या असलेल्या व्यक्तीने शक्य तितक्या लवकर डॉक्टरांकडून तपासून घ्यावे. कर्करोगाच्या सुरूवातीला दुखत नाही. त्यामुळे ही लक्षणे असल्यास, दुखू लागण्याआधी, डॉक्टरांना भेटा.

रोगाचे निदान लवकर झाल्यास शस्त्रक्रिया हा पहिला उपचार आणि रेडिएशन किंवा केमोथेरपी केल्याने रोगावर नियंत्रण आणता येऊ शकते. कर्करोगाचे अनेक प्रकार असल्याने एकाच प्रकारचा उपचार कॅन्सर बरा करू शकत नाही. अचूक निदान आणि दररोज नव्या औषधांची पडणारी भर यामुळे आज ५८ टक्के कॅन्सर बरे होतात किंवा आटोक्यात राहू शकतात. ६३ टक्के कॅन्सरमध्ये उपचारानंतर रुग्ण सामान्य आयुष्य जगू शकतो.
कोणाला कर्करोग होण्याची शक्यता अधिक आणि कोणाला नाही हे मात्र अजून नक्की सांगता येत नाही. कॅन्सर कोणाला होण्याची शक्यता आहे हे मात्र सांगता येते. कॅन्सरचा धोका काही व्यक्तीमध्ये वाढतो. त्याच प्रमाणे काही उपायामुळे कॅन्सर धोक्याचे प्रमाण कमी होते

उपचारासाठी योजना :
महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत लाभार्थ्यांना सर्वसाधारण शस्त्रक्रिया, नेत्र शस्त्रक्रिया, स्त्री रोगावरील शस्त्रक्रिया, अस्थिव्यंग शस्त्रक्रिया, हृदय शस्त्रक्रिया व उपचार, जठर व आतड्याच्या शस्त्रक्रिया व उपचार, बालरोग शस्त्रक्रिया व उपचार, मेंदू व मज्जासंस्था यांचे आजारावरील शस्त्रक्रिया व उपचार, प्लास्टिक सर्जरी, जळीत रुग्णावरील उपचार, कृत्रिम अवयव, आकस्मिक वैद्यकीय उपचार, त्वचेच्या, सांध्याच्या व फुफफुसाच्या आजारावरील आकस्मिक उपचार, ऐनडोक्राईन, लहान मुलांचे कर्करोग, मानसिक आजार व इंटरव्हेशनल रेडीऑलोजी उपचार यांचा लाभ मिळतो. १५५३८८ / १८००२३३२२०० या टोल फ्री नंबर वर लाभार्थी योजनेची माहिती घेऊ शकतात तसेच सेवेबाबत तक्रार करू शकतात. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत लाभार्थी कुटुंबाला प्रति कुटुंब प्रति वर्ष १.५० लक्ष पर्यंत विमा संरक्षण मिळते. मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी ही मर्यादा २.५० लक्ष आहे.