Site icon Krishi Pandhari | कृषी पंढरी

ओवा पीक शेतकऱ्यांसाठी उत्तम पर्याय

परभणी व अकोला कृषि विद्यापीठाचा संयुक्‍त राज्‍यस्‍तरीय ऑनलाईन ओवा पिक लागवडीवर कार्यशाळा संपन्‍न

महाराष्ट्रातल्या कोरडवाहू भागामध्ये ओवा हे पीक एक चांगला पर्याय आहे. या पिकाच्या क्षेत्रामध्ये वाढ करण्यासाठी व यातील निर्यातीच्या संधीचा लाभ घेण्‍यासाठी शेतकऱ्यांनी एकत्र येऊन गटांच्या माध्यमातून या पिकाची लागवड करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन कुलगुरू मा डॉ अशोक ढवण यांनी केले.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठांतर्गत असेलेले औरंगाबाद कृषी विज्ञान केंद्र व अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १७ ऑगस्ट रोजी आयोजित राज्यस्तरीय ऑनलाईन ओवा पीक लागवड तंत्रज्ञान कार्यशाळेच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमास अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ विलास भाले, अजमेर येथील राष्ट्रीय मसाला बियाणे संशोधन संस्थेचे संचालक डॉ. गोपाल लाल, आयसीएआर-अटारी पुणेचे संचालक डॉ. लाखन सिंग, विस्तार शिक्षण संचालक डॉ. डी. बी. देवसरकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.

कुलगुरू मा डॉ विलास भाले यांनी विदर्भातील ओवा पिकाखालील क्षेत्र आणि त्याची सद्यपरिस्थिती याबद्दल माहिती देऊन अकोला कृषि विद्यापीठ विकसित ओवा मळणी यंत्राचा ओव्याच्या काढणी पश्‍चात प्रक्रिया साठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन केले.

मार्गदर्शनात मा. डॉ. गोपाल लाल म्‍हणाले की, आरोग्याच्या दृष्टीनेही ओव्याला अनन्यसाधारण महत्त्व असनु आज देशात जवळपास दोन मिलियन टन ओवा चे उत्पादन होते. त्यापैकी जवळपास १७ टक्के मालाची निर्यात केली जाते. या पिकांत निर्यातीसाठी मोठ्या प्रमाणात संधी असल्याचंही त्यांनी सांगितलं.

डॉ. लाखन सिंग यांनी प्रत्येक कृषी विज्ञान केंद्राच्या प्रक्षेत्रावर प्राथमिक स्वरूपाचा मसाला पिकांचा पार्क असणे गरजेचे असल्याचे सांगुन अशा प्रकारचा पार्क प्रत्येक केव्हीकेने आपल्या प्रक्षेत्रावर व दत्तक गावांत विकसित करावा असे सुचविले. डॉ. डी. बी. देवसरकर यांनी वनामकृवि परभणी व डॉ.पंदेकृवि, अकोला या विद्यापीठाच्या शेतकऱ्यांच्या हितासाठीच्या विविध संयुक्तिक कार्यक्रमाबद्दल माहिती दिली व विद्यापीठे शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीसाठी सदैव कार्यरत असल्याचे सांगितले.

Exit mobile version