Site icon Krishi Pandhari | कृषी पंढरी

महिला दिन विशेष : बचत गटाच्या माध्यमातून प्रेरणादायी वाटचाल

प्राप्त प्रतिकूल परिस्थितीवर मात करून पाटील गल्ली, धारूर येथील रहिवासी शिवकन्या दत्तात्रय दीक्षित यांची बचत गटाच्या माध्यमातून सुरू असलेली वाटचाल इतर महिलांसाठी निश्चितच प्रेरणादायी आहे. दिशा महिला बचत गट असे त्यांच्या बचत गटाचे नाव आहे. त्यांच्या बचत गटात 10 सदस्य आहेत. दिनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानातून त्यांनी 2018 साली हा बचत गट स्थापन केला आहे. या बचत गटाच्या माध्यमातून शिवणकाम, शेवया तयार करणे व पापड बनविणे, असे 3 व्यवसाय त्या करतात.

बचतगट स्थापन झाल्यानंतर शिवकन्या दीक्षित यांनी आवास योजनेतून घर बांधायला काढले होते. पण, दोन वर्षांपूर्वी सुवर्णकारागीर असलेल्या त्यांच्या पतीचे हृदयविकाराच्या धक्क्याने अचानक निधन झाले. घरी सासूबाई, शिवकन्या यांची 2 मुलं, दीर, जाऊ, त्यांची 2 मुलं असं एकत्र कुटुंब. त्यांचे दीर सुवर्णकारागिरीचे काम करतात. त्यामुळे घरची परिस्थिती जेमतेमच. त्यामुळे पतीच्या निधनानंतर एकत्र कुटुंबाला हातभार लावण्याची शिवकन्या दीक्षित यांनी मानसिक तयारी केली. खचून न जाता त्यांनी नवीन व्यवसाय करण्यासाठी पदर खोचला खरा. परंतु, आर्थिक अडचणीमुळे त्यांचे स्वप्न पूर्ण होऊ शकत नव्हते.

दरम्यान, बचतगटाच्या एका बैठकीमध्ये वेगवेगळ्या योजनांची, उद्योगाची व मार्केटिंगची माहिती त्यांना महिला आर्थिक विकास महामंडळ बीडकडून मिळाली. माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी एस. बी. चिंचोलीकर व प्रेरणा लोकसंचलित साधन केंद्र, केजचा स्टाफ यांच्याकडून त्यांना आवश्यक ती माहिती मिळाली. पण, भांडवलाची अडचण होतीच. ती त्यांनी उपस्थितांसमोर मांडली. त्यावर तुम्हाला उद्योग सुरु करायचा असेल तर तुमच्या गटाचा बँक कर्जासाठीचा प्रस्ताव नियमानुसार सादर करू, असे श्री. चिंचोलीकर यांनी त्यांना सांगितले. त्यानुसार गटाच्या बैठकीत निर्णय घेऊन त्यांनी आयसीआयसीआय बँकेकडे प्रस्ताव सादर केला.

याबाबत शिवकन्या दीक्षित म्हणाल्या, माझा डिझाईनरचा कोर्स झाला होता. परंतु, शिलाईमशीन नसल्यामुळे माझा व्यवसाय सुरु होऊ शकला नव्हता. तो बचत गटामुळे सुरु झाला. हा बचतगट सुरु झाल्यापासून गटामधे अंतर्गत कर्ज घेऊन मी शिलाई मशीन घेतली व माझ्या व्यवसायाला सुरुवात झाली, असे त्यांनी सांगितले.

हळूहळू बचतगटाचे व्यवहार मोठ्या प्रमाणावर होऊ लागले. दिशा महिला बचतगटाच्या पात्रतेनुसार त्यांना पहिले कर्ज रुपये एक लाख असे तीन टप्प्यात एकूण सहा लाख रुपये बँकेचे कर्ज मिळाले. याचा फायदा घेत शिवकन्या दीक्षित यांनी दुसरा व्यवसाय सुरू करत पुढचे पाऊल टाकले.

त्या म्हणाल्या, बचत गटाला कर्ज मिळाल्यानंतर एक लाख तीस हजार रुपये बँक व अंतर्गत कर्ज घेऊन मी शेवया तयार करण्याची मशीन खरेदी केली व माझा शेवया करून देण्याचा दुसरा व्यवसाय पण सुरु झाला. त्यामुळे मी बचतगटातील इतर महिलांना पण रोजगार उपलब्ध करून दिला. अशाप्रकारे माझे दोन व्यवसाय सुरळीत चालू झाले व मला दरदिवसाला सर्व खर्च जाता ५०० ते ७०० रुपये व हंगामामध्ये १००० ते १५०० रुपयांचे दररोज उत्पन्न मिळू लागले.

तरी पण या दोन व्यवसायावर अवलंबून न राहता आर्थिक सक्षमीकरणासाठी आणखी एक व्यवसाय करण्याची तयारी शिवकन्या दीक्षित यांनी केली. त्यासाठी त्यांनी बचतगटातून काही व व्यवसायातून काही रक्कम गुंतवून पापड तयार करण्याचे यंत्र खरेदी केले. सध्या शिलाई, शेवया निर्मिती व पापड बनविणे असे त्यांचे तीन व्यवसाय व्यवस्थितपणे सुरु आहेत. शिवकन्या दीक्षित यांचे व्यवसायाचे स्वप्न महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) च्या बचतगटामुळे साकार झाले. तसेच त्यांच्या संसाराला आर्थिक मदत झाली. दरम्यान, व्यवसाय सुरू होताच त्यांनी अपूर्ण राहिलेले घराचे बांधकाम, शौचालय बांधकामही केले. शिवाय त्यांच्या जाऊबाईंनाही मेस चालवण्यासाठी प्रोत्साहन दिले. आता त्यांच्या कर्जाचा एकच हप्ता भरायचा राहिला आहे, हे विशेष.

शिवकन्या दीक्षित यांची एकूणच प्रगतीकडे वाटचाल सुरू असून, त्यासाठी त्या बचत गटातील सर्व महिलांचे

Exit mobile version