Site icon Krishi Pandhari | कृषी पंढरी

नुकसानाचा आढावा घेऊन मदत देणार -उपमुख्यमंत्री

शिरोळ येथील पूर परिस्थितीची उपमुख्यमंत्र्यांकडून पाहणी

कोल्हापूर दि. 27 :-  पूर ओसरल्यानंतर पूरग्रस्त गावातील नागरिकांच्या पुनर्वसनाबरोबच शेती, व्यापार आणि कौटुंबिक साहित्याच्या नुकसानीबाबत आढावा घेऊन पूरग्रस्तांना मदत देण्यात येईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज शिरोळ येथे पूर परिस्थिती पाहणी प्रसंगी दिली.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज शिरोळ येथील जनता हायस्कूल, अर्जुनवाड रोड येथील पूर परिस्थितीची पाहणी करुन पद्माराजे विद्यालय, शिरोळ येथील पूरग्रस्तांच्या तात्पुरत्या निवारा केंद्रास भेट दिली व त्यांच्याशी संवाद साधला.

यावेळी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, जलसंपदामंत्री जयंत पाटील, पालकमंत्री सतेज पाटील, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, शिरोळचे नगराध्यक्ष अमरसिंह पाटील, खासदार धैर्यशील माने उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले, पूर बाधितांच्या पुनर्वसनाबाबत संबंधित गावातील ग्रामस्थांशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल. ज्या गावांशेजारी गायरान उपलब्ध आहेत तेथे पूर बाधित गावांच्या पुनर्वसनासाठी विचार केला जाईल. यासाठी संबंधित गावाने ग्रामसभा घेऊन निर्णय घेणे आवश्यक आहे.

पूर परिस्थ‍ितीची तीव्रता कमी होण्यासाठी नवीन रस्ता करताना बांधण्यात येणारे पूल कॉलम अथवा कमान करून केले जावेत, अशी मागणी अर्जुनवाड येथे पूर परिस्थिती पाहणी प्रसंगी पूरग्रस्त ग्रामस्थांनी केली. याबाबत उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना जागेवरच सूचना देऊन याची अंमलबजावणी करण्याबाबत निर्देशित केले. नवीन रस्ता करताना यापूर्वी आलेल्या महापुराच्या पाणी पातळीचा अभ्यास करून रस्त्याची उंची वाढविण्यात यावी, अशा सूचना त्यांनी  यावेळी दिल्या.

पद्माराजे विद्यालय येथील निवारा केंद्रातील पूरग्रस्तांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आस्थेवाईकपणे विचारपूस केली. निवारा केंद्रामध्ये  चहा, नाश्ता, जेवण, आरोग्य सुविधा मिळतात का याची माहिती त्यांनी घेतली. तसेच राज्य सरकार प्रत्येक नागरिकाच्या पाठीशी ठामपणे उभे असून पूरग्रस्तांना योग्य ती सर्व मदत करणार असल्याचा विश्वास उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी पूरग्रस्तांना दिला.

Exit mobile version