Site icon Krishi Pandhari | कृषी पंढरी

बाधित शेतकऱ्यांना मदत करणार

अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे, पशुधनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांच्या जमिनीचे  सरसकट पंचनामे करुन जास्तीत जास्त  मदत करणार असल्याची ग्वाही उद्योग व खनिकर्म मंत्री तथा जिल्ह्याचे  पालकमंत्री सुभाष देसाई यांनी शेतकऱ्यांना दिली.

गंगापूर  तालुक्यातील आसेगाव व वैजापूर तालुक्यातील सोनेवाडी येथील बाधित झालेल्या शेतपिकांची पाहणी केली. तसेच शेतकऱ्यांशी संवाद साधून श्री. देसाई यांनी शेतकऱ्यांना धीर दिला. यावेळी आमदार अंबादास दानवे, आमदार प्रा.रमेश बोरनारे, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण उपस्थित होते.

पालकमंत्री देसाई म्हणाले, जिल्ह्यामध्ये पावसामुळे झालेल्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. शेतपिकांसह पशुधनाचेही नुकसान झालेले आहे. झालेले नुकसान आर्थिक मदत देऊन भरुन येईल, असे नाही. मात्र, शेतकऱ्यांना धीर देऊन शासन सदैव त्यांच्या पाठीशी आहे, असे ते म्हणाले.

गंगापूर तालुक्यातील आसेगावातील सोमीनाथ जीते,नामदेव जीते यांच्या शेतीत झालेल्या नुकसानीची पाहणी श्री. देसाई यांनी केली. आसेगावात कापूस, मका, तुर, बाजरी, मुग, भूईमूग, सोयाबीन फळबाग आदीसंह भाजीपाल्याचे क्षेत्रांचे नुकसान झाले, असे यावेळी श्री.देसाई यांना कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

वैजापूर तालुक्यातील अतिवृष्टीमुळे सोनवाडी गावातील अनेक घरात पाणी शिरले होते. पालकमंत्री देसाई यांनी लासूर गावपुरामुळे बाधित व स्थलांतरीत झालेल्या कुटुंबियांना भेट देऊन नागरिकांशी संवाद साधनू त्यांचे मनोधैर्य उंचावले.

Exit mobile version