मुंबई दि. २६: बँकेच्या कर्जामुळे हैराण झालेले शेतकरी महेंद्र देशमुख यांनी आपल्या लहान मुलीसह मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान ‘मातोश्री’मध्ये घुसण्याचा प्रयत्न जानेवारीत महिन्यात केला होता. पोलिसांनी धक्काबुक्की करत त्यांना ताब्यात घेतले होते. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणी न्याय देण्याचे आश्वासन शेतकऱ्याला दिले होते. मात्र अद्याप न्याय न मिळाल्याचे सांगत आपली पत्नी आणि मुलीसह ते मातोश्रीबाहेर उपोषणाला आला. त्यानंतर पोलिसांनी शेतकऱ्याला ताब्यात घेतले.
रायगडचा हा शेतकरी पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानाबाहेर उपोषणाला बसला आहे. महेंद्र देशमुख यांनी आपल्या लहान मुलीसोबतच पत्नीलाही घेऊन ‘मातोश्री’ गाठले, मात्र पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. फेब्रुवारीत अधिवेशनात उद्धव ठाकरेंनी सांगितले की यांचे प्रकरण तडीस न्या, पण आजपर्यंत कोणीही न्याय दिला नाही. जून महिन्यापासून मी मुख्यमंत्र्यांच्या भेटीचे प्रयत्न सुरु केले, मात्र कोणीही भेट होऊ दिली नाही, असा आरोप महेंद्र देशमुख यांनी केला.
असे आहे कारण
पनवेल तालुक्यातील आपटा शाखेच्या बँक ऑफ इंडियाने फसवणूक केल्याचा आरोप करत शेतकरी महेंद्र देशमुख यांनी आंदोलन केले होते. या प्रकरणाची त्रिसदस्यीय समितीमार्फत आठ दिवसांत चौकशी करण्याचे निर्देश कृषिमंत्र्यांनी ६जानेवारीला रायगड जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते. विभागाचा कार्यभार स्वीकारण्यापूर्वी एका शेतकऱ्याला न्याय देण्याचा प्रयत्न करत असल्याचेही कृषिमंत्री म्हणाले होते. मातोश्रीवरील आंदोलनापासून चर्चेत असलेले महेंद्र देशमुख पनवेल तहसीलदार कार्यालयात पत्नी आणि तीन मुलींसह उपोषणाला आले होते.
मात्र या चौघांना पोलिसांनी बसू दिले नाही. पनवेल तहसीलदार अमित सानप यांनी कर्ज न घेताच शेतकऱ्यावर खोटे कर्ज दाखवले. तसेच त्याच्या फिक्स डिपॉझिटची रक्कम त्याला परत मिळू नये यासाठी हे षड्यंत्र रचल्याचा आरोप शेतकरी महेंद्र देशमुख यांनी केला आहे. महेंद्र देशमुख यांनी तीन मुलींच्या शिक्षणासाठी, तसेच स्वखर्चासाठी २३ फेब्रुवारी २००६ रोजी ८ लाख ४० हजार एवढी रक्कम फिक्स डिपॉझिट खात्यात जमा केली. बँक ऑफ इंडियाच्या आपटा शाखेत त्यांची ही रक्कम जमा होती.