ओळख वाणांची : कमी पाण्यातले गव्हाचे वाण

अ कोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या गहू संशोधन विभागाने कोरडवाहू व केवळ दोन पाण्यांच्या पाळ्यांमध्ये येणारे गव्हाचे वाण संशोधित केले  ‘पीकेव्ही वाशिम – २०१०’ असे या वाणाचे नामकरण करण्यात आले . १९९६ मध्ये या वाणाचे संशोधन सुरू करण्यात आले होते व त्याच्या संशोधनासाठी जवळपास १५ वर्षे लागली.

या वाणाची सात ठिकाणी चाचणी केंद्रे होती. त्यामध्ये विदर्भातील पाच ठिकाणांचा समावेश आहे. या वाणाच्या घेतलेल्या चाचण्यांवरून हे वाण कोरडवाहू शेतीत हेक्टरी १४ क्विंटल, तर दोन ओलितामध्ये हेक्टरी २० क्विंटलपर्यंत उत्पादन देते. वाणाचा उत्पादनापर्यंतचा कालावधी ११५ ते १२० दिवसांचा असल्याचे अभ्यासाअंती स्पष्ट झाले आहे.

‘पीकेव्ही वाशिम – २०१०’ या वाणाला विद्यापीठ, आंतरविद्यापीठांची संयुक्त कृषी विकास समिती, राज्य बियाणे समिती असा प्रवास करीत केंद्रीय बियाणे समितीपर्यंत जावे लागले. केंद्रीय बियाणे समितीकडे त्याला लवकरच नोटिफिकेशन मिळेल, असे पोटदुखे यांनी सांगितले. याआधी या विभागाच्या ‘एकेएडब्ल्यू – ४६४७’ हे संशोधित वाण बागायती क्षेत्रात उशिरा पेरणीसाठी महाराष्ट्र व कर्नाटक राज्यांसाठी अधिसूचित (नोटिफाईड) झाले आहे. हे वाण ‘महाबीज’मार्फत प्रदर्शित करण्याची प्रक्रियाही सुरू झालेली आहे. या वाणापासून हेक्टरी ४२ ते ४४ क्विंटल उत्पादन मिळते हेे अभ्यासाअंती सिद्ध झाले आहे.