मागील आठवड्यापासून राज्यात तापमानाचा पारा घसरला आहे. त्यामुळे पुणे, मुंबईसह विदर्भ आणि मराठावाड्याला दिलासा मिळाला आहे. पण राज्यात कोसळणाऱ्या अवकाळी पावसानं शेतकऱ्यांची चिंता वाढवली आहे. राज्यातील शेतकऱ्यांच्या शेतात कांदा आणि द्राक्षे ही पिकं पडून आहेत. त्यामुळे गेल्या चार-पाच दिवसांपासून राज्यात विविध ठिकाणी अवकाळी पावसानं हजेरी लावल्यानं शेतकऱ्यांचं बरंच नुकसान होतं आहे. आजही महाराष्ट्रातलं हवामान काही अंशी ढगाळ राहणार आहे. तर मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
गेल्या काही दिवसांपासून कोकण विभागातील हवामान स्थिर असून तापमानाचा पारा सरासरी तापमानाच्या खाली गेला आहे. येथील कमाल आणि किमान तापमानातही घसरण पाहायला मिळत आहे. तर शनिवारी रात्रीपासून पुणे शहरासह ग्रामीण भागात विविध ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे नागरिकांनी उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे. पण अजूनही पुण्यात अवकाळी पावसाचा धोका कमी झाला नाही. याठिकाणी आजही अवकाळी पावसाचे काळे ढग घोंघावत आहेत.
नाशिकसह मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत अवकाळी पाऊस जोर धरू शकतो. या भागात विजेच्या गडगडाटासह अवकाळी पावसाची जोरदार हजेरी लागण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. काल महाराष्ट्रातील सांगली, सातारा, कोल्हापूर आणि कोकणातील सिंधुदुर्ग, रायगड या जिल्ह्यांना अवकाळी पावसानं झोडपलं आहे. यावेळी शेतकऱ्यांचा शेतातील माल भिजला आहे. याचा तोटा त्यांना सहन करावा लागला आहे.
दुसरीकडे नाशिक जिल्ह्यात अनेक शेतकऱ्यांच्या शेतात अजूनही द्राक्षे तशीचं पडून आहेत. अशा शेतकऱ्यांना अवकाळी पावसाची चिंता सतावत आहे. त्यामुळे नाशिक, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातीतील नागरिकांनी अवकाळी पावसापासून वाचण्यासाठी योग्य ती काळजी घ्यावी, असा सल्ला हवामान खात्यानं दिला आहे.