वैशाली तशी हुशार आणि हल्लीच्या भाषेत सांगायचं झालं तर ‘स्मार्ट’ मुलगी. सगळं काही स्वतःच्या जोरावर मिळवलं पण वैशालीमधला एक अवगुण म्हणजे दुसऱ्याला कमी लेखून स्वतःला श्रेष्ठ समजणं. या जगात प्रत्येक व्यक्तीच्या ठायी काही ना काही गुण आहेत. म्हणून येथे कोणीही श्रेष्ठ व कनिष्ठ नाही. प्रत्येकाच्या गुणांचा आदर करावा. कारण प्रत्येकामध्ये कधीही समान गुण आढळत नाही. पण तिच्या हे लक्षात येत नव्हतं. याचमुळे तिच्या आनंदात सहभागी लोक फार नव्हतेच. वैशालीने कधी स्वतःशी स्पर्धा केलीच नाही केली ती सतत दुसऱ्यांशी. कदाचित याचमुळे आज तीच प्रमोशन झालं याचा पुरेपूर आनंद ती घेऊ शकत नव्हती.
तुम्ही मात्र असे करणार नाही. त्यासाठी पुढील बाबी लक्षात घ्या.
१. प्रत्येक माणसाची हीच तर समस्या आहे. दर वेळी इतरांमध्ये काय कमतरता याचाच शोध सुरु असतो. स्वतःची गुणवत्ता कशी वाढवावी हा विचार करणारे फार कमी आहेत.
२. सतत दुसऱ्यांच्या सतत चुका काढणे. जगात कोणतीही व्यक्ती 100 टक्के चुकीची व 100 टक्के बरोबर नसते. परिस्थिती मनुष्याच्या वर्तणुकीला कारणीभूत असते. परंतु हे लक्षातच येत नाही. काही असेही लोक पाहण्यात येतात ज्यांना दुसऱ्यांच्या यशाबद्दल मत्सर वाटतो.
३. प्रत्येक व्यक्ती स्वतःच्या बळावर यश मिळवते. ती व्यक्ती कष्ट करत असताना आपण त्यामध्ये मदत करायला जात नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीच्या यशाबद्दल मत्सर वाटू नये. या अशाच व्यक्ती इतरांशी आपली तुलना करतात.
४. दुसऱ्यांच्या दुःखात सुख मानतात. पण सुख किंवा दुःख हे प्रत्येकाला भोगावं लागत. कोणताही माणूस फक्त सुखात किंवा फक्त दुःखात राहात नाही. त्यामुळे कोणाच्या दुःखात स्वतःचे सुख मानू नका किंवा स्वतः दुःखात असल्यामुळे दुसऱ्याला दुःखी करू नये.
६. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे खोटा अहंकार. अहंकाराने कोणालाही काहीही मिळालं नाही. अहंकार हा माणसाचा शत्रू आहे. यामुळे संवाद कमी होतो. विसंवाद वाढतो.
खरं तर जगात अनेक गोष्टी अशा असतात, ज्या सहजपणे सोडून देता येतात. पण त्या धरून ठेवण्याचा अट्टहास आपल्या त्रासाला, वैतागाला कारणीभूत ठरत असतो. त्यामुळे सोडून द्यायला शिका आणि आनंदी जगा.