Site icon Krishi Pandhari | कृषी पंढरी

उद्या मतदान, यंत्रणा सुसज्ज मतदानासाठी पथके केंद्रावर रवाना

अमरावती, दि. 30 :  शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी मतदान उद्या (दि. 1) होत  असून, जिल्ह्यातील मतदान केंद्रांसाठी पथके आज रवाना झाली. सर्व पथकांनी आपापली जबाबदारी नीट समजून घेऊन, निवडणूक आयोगाच्या निर्देशांचे पालन करण्याचे आदेश निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त पीयुष सिंह यांनी दिले.

शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी 1 डिसेंबरला सकाळी 8 ते सायंकाळी पाचपर्यंत मतदान होणार आहे. निवडणुकीसाठी 27 उमेदवार रिंगणात आहेत. मतदारांची संख्या 35 हजार 622 असून, त्यात 26 हजार 60 पुरूष आणि 9 हजार 562 महिलांचा समावेश आहे. मतदानासाठी जिल्ह्यातील नियुक्त पथकांना निवडणूक साहित्याचे वितरण आज जिल्हाधिकारी कार्यालयातील बॅडमिंटन हॉल येथून करण्यात आले.  सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी शैलेश नवाल, उपजिल्हा निवडणूक अधिकारी वर्षा पवार आदी उपस्थित होते.

निवडणूक साहित्य संच अमरावती जिल्हाधिकारी स्तरावर तयार करण्यात आले. त्यांचे विकेंद्रीकृत पद्धतीने वितरण आज करण्यात आले. याचठिकाणी मतदान पथकाला मतदान प्रक्रियेविषयी पुन्हा माहिती देण्यात आली व त्यानंतर पोलीस बंदोबस्तात पथके मतदान केंद्रांवर रवाना झाली. जिल्ह्यात पंचवीस मतदान केंद्रे आहेत.    

मतदान केंद्रे पुढीलप्रमाणे : धारणी- तहसील कार्यालय, चिखलदरा- तहसील कार्यालय, दर्यापूर-तहसील कार्यालय, अंजनगाव सुर्जी- तहसील कार्यालय, अचलपूर- तहसील कार्यालय व उपविभागीय कार्यालय, चांदूर बाजार- तहसील कार्यालय, भातकूली- उपविभागीय कार्यालय व तहसील कार्यालय, अमरावती (ग्रामीण)- गणेशदास राठी हायस्कुल कक्ष क्रमांक 4, अमरावती (शहर)- जि.प. ऊर्दू मुलींची शाळा कक्ष क्र. 2, जि.प. ऊर्दू मुलींची शाळा कक्ष क्र. 3, जि.प. ऊर्दू मुलींची शाळा कक्ष क्र. 4, जि.प. मुलींची शाळा (कॅम्प) येथील कक्ष क्रमांक 2, 3 व 4, गोल्डन किड्स इंग्लीश स्कूल कक्ष क्रमांक 6, 7 व 8, मोर्शी- तहसील कार्यालय, वरुड- तहसील कार्यालय (2), तिवसा- तहसील कार्यालय, नांदगाव खंडेश्वर- तहसील कार्यालय, चांदूर रेल्वे- तहसील कार्यालय, धामणगाव रेल्वे- तहसील कार्यालय.

उद्या मतदान प्रक्रिया संपल्यानंतर निवडणूक साहित्याचे संकलनही विकेंद्रीकृत पद्धतीने होणार आहे. मतदान केंद्रावरील साहित्य सर्वप्रथम जिल्हास्तरावरील सुरक्षा कक्षामध्ये जमा केले जाईल. सर्व मतदान केंद्राकडून साहित्य जिल्हास्तरावर संकलित झाल्यानंतर ते साहित्य विलासनगर येथील शासकीय धान्य गोदामात सुरक्षा कक्षात ठेवण्यात येईल. त्यानुसार सर्व सुरक्षितता उपायांची अंमलबजावणी करत आवश्यक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

प्रत्येक मतदान केंद्रावर व्हिडीओग्राफी व वेबकास्टिंग करण्यात येणार असून, तशी यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. मतदारांच्या माहिती देण्यासाठी प्रत्येक केंद्रावर मतदार सहायता कक्ष उभारण्यात आला आहे. त्यामुळे मतदारांना मतदान यादीत नाव शोधण्यास मदत होईल. त्याचप्रमाणे, कोरोना संशयित व्यक्ती आढळल्यास त्यांच्यासाठी विलगीकरण कक्षही स्थापण्यात आला आहे.

Exit mobile version