Site icon Krishi Pandhari | कृषी पंढरी

कोरोना सुटीच्या दिवशी लसीकरण सुरू राहणार

एप्रिल महिन्यात सर्व सार्वजनिक आणि खाजगी कोविड लसीकरण केंद्रांवर राजपत्रित सुट्यांसह सर्व दिवशी लसीकरण सुरू राहणार.

देशभर सुरू असलेल्या लसीकरणाची व्याप्ती आणखी वाढवण्याच्या दृष्टीने एक महत्त्वाचे पाऊल म्हणून केंद्र सरकारने सर्व सरकारी आणि खाजगी कोविड लसीकरण केंद्रे एप्रिल महिन्यात( आजपासून 30 एप्रिलपर्यंत) सर्व दिवशी सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. एप्रिल 2021 मध्ये राजपत्रित सुट्यांसह सर्व दिवशी लसीकरण सुरू ठेवण्यासाठी आवश्यक ती व्यवस्था करण्याचे लेखी निर्देश केंद्र सरकारने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्राद्वारे दिले आहेत. 31 मार्च 2021 रोजी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांशी सविस्तर चर्चा केल्यानंतर देशभरात सर्व सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातील लसीकरण केंद्रांचा पुरेपूर वापर करून कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेची गती आणि व्याप्ती वाढवण्याच्या उद्देशाने सरकारने हे पाऊल उचलले आहे. कोविड-19 प्रतिबंधक लसीकरणासाठी राज्ये/ केंद्रशासित प्रदेश यांच्यासोबत भारत सरकारकडून विशिष्ट टप्प्याने आणि अतिशय सक्रिय पद्धतीने राबवल्या जात असलेल्या धोरणाला अनुसरून हा निर्णय आहे.

देशात कोविड-19 महामारीची सर्वाधिक झळ पोहोचण्याची शक्यता असलेल्या गटांमधील लोकांचे संरक्षण करण्यासाठी लसीकरण मोहीम सर्वात महत्त्वाचे साधन आहे आणि त्याचा नियमितपणे आढावा घेतला जाणार आहे आणि त्यावर उच्च पातळीवरून देखरेख ठेवली जाणार आहे. लसीकरण करण्याविषयीच्या एका राष्ट्रीय तज्ञ समितीच्या शिफारशींच्या आधारावर एक एप्रिल 2021पासून 45 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या सर्व लोकांचे लसीकरण करण्याचा निर्णय सरकारने यापूर्वीच घेतला होता.

Exit mobile version