महाराष्ट्रात १८ वर्षावरील नागरिकांच्या लसीकरणाला सुरुवात

महाराष्ट्रात कालपर्यंत ३० ते ४४ वयोगटातील व्यक्तींचे लसीकरण करण्यात येते होते. लसीकरणाच्या कार्यक्रमाला वेग द्यायचा आहे आणि त्यामुळे अठरापासून पुढच्या सर्व वयोगटातील वर्गाला लसीकरणाला मान्यता आजपासून देत आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. ते म्हणाले, महाराष्ट्राच्या तरुणाईला मला यानिमित्ताने सांगावसं वाटतं की, आपण आपापल्या जिल्ह्यातील लसीकरण केंद्रावर जाऊन अठरा वर्षाच्या पुढील युवक-युवतीपासून पुढील सर्व वयोगटातील लोकांना लसीकरण करणं आता शक्य होणार आहे.

मुख्यमंत्र्यांनी घेतला राज्यातील ग्रामीण आरोग्य सुविधांचा आढावा

राज्याच्या ग्रामीण भागातील आरोग्य केंद्राच्या पायाभूत सुविधांची जी बांधकामे प्रगतीपथावर आहेत, ती आधी पूर्णत्वाला नेली जावीत. त्यानंतर नवीन आरोग्य संस्थाना मान्यता देताना त्याचा प्राधान्यक्रम निश्चित केला जावा, अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या.

राज्यात कोविड १९ च्या संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेऊन या लाटेचा मुकाबला करण्यासाठीची राज्याची तयारी आणि करावयाच्या उपाययोजना याचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. राज्यातील आरोग्य सेवा-सुविधा तसेच प्राणवायू उत्पादन निर्मिती व साठवणूक क्षमता यांची त्यांनी माहिती घेतली.

मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले की, कोविड संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यात अनेक ठिकाणी तात्पुरत्या स्वरुपात आरोग्य सुविधा निर्माण केल्या आहेत. त्यातील कुठल्या सुविधा भविष्यात कायम स्वरुपी ठेवता येतील व कोणत्या सेवांचे श्रेणीवर्धन करता येईल, याचा आराखडा तयार करावा. आरोग्य संस्थांची जी बांधकामे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून केली जातात त्याची कालबद्धता आणि जबाबदारी निश्चित करावी. तसेच आरोग्य केंद्रांच्या पायाभूत सुविधांच्या निर्माण व दुरुस्तीसाठी स्वतंत्र निधी राखून ठेवण्यात यावा. उभारलेल्या आरोग्य सुविधा चालवण्यासाठी लागणारे मनुष्यबळ आणि त्याच्यासाठी लागणारा खर्च याकडेही लक्ष दिले जावे. नवीन आरोग्य संस्थांना मंजुरी देतानाच पदांनाही मंजुरी दिल्यास कालापव्यय टाळता येईल.

दुर्गम भागातील आरोग्य सुविधांसाठी उद्योजक, संस्थांची मदत घेता येईल का याचाही विचार करावा. आरोग्य क्षेत्रातील पायाभूत सुविधांच्या उभारणी संदर्भातील सादरीकरण करून ते कोणती जबाबदारी घेऊ शकतात हे त्यांना विचारावे, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. मेळघाट, जव्हार, मोखाडा यासारख्या आदिवासी भागातील आरोग्य संस्थांचे सक्षमीकरण वेगाने करावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.