डोंग्यातून रोहित्र वाहून वीज पुरवठा पूर्ववत

महावितरण कर्मचाऱ्यांचे उर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी केले कौतूक

मुंबई- चंद्रपूर परिमंडळातील बल्लारशा विभाग अंतर्गत पोंभुर्णा तालुक्यातील अगदी शेवटच्या टोकावर असलेले टोक (गंगापूर) गावातील दोन कृषिपंप ग्राहकांचे कनेक्शन असलेल्या रोहित्रामध्ये नुकताच बिघाड झाल्याने त्या ग्राहकांचा विजपुरवठा खंडित झाला होता.

या कृषि ग्राहकांसाठी जीवाची पर्वा न करता डोंग्याने रोहित्र वाहून नेत त्यांचा वीज पुरवठा पूर्ववत करणाऱ्या महावितरणचे अभियंते आणि कर्मचारी यांचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी अभिनंदन केले.

“चंद्रपूर जिल्ह्यातील पोंभूर्णा तालुक्यातील टोक गंगापूर या गावातील कृषी पंप थकबाकीमुक्त शेतकऱ्यांचा वीज पुरवठा सुरू करण्यासाठी महावितरणने प्रयत्नांची शर्थ केली. थकबाकीमुक्त शेतकरी व महावितरणचे अभियंता कुणाल पाटील व तंत्रज्ञ यांनी सर्वांसाठी एक आदर्श निर्माण केला आहे,” असे डॉ. राऊत यांनी समाज माध्यमावरील पोस्ट मध्ये म्हटले आहे. थकबाकीमुक्त होऊन आपल्या अडचणींवर मात करण्यासाठी शेतकऱ्यांनी असेच महावितरणला सहकार्य करावे असे आवाहन उर्जामंत्र्यांनी केले आहे.

ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या संकल्पनेतून ऊर्जा विभागाने तयार केलेल्या नवीन कृषि पंप वीज जोडणी धोरणाचा लाभ घेत थकबाकीमुक्त होण्यासाठी या दोन शेतकऱ्यांना सहाय्यक अभियंता कुणाल पाटील यांनी समजावले.

टोक (गंगापूर) गावातील हे दोन कृषिपंप ग्राहक शांताबाई किसन दायले व टेकलू नारायण कस्तुरे या दोन्ही ग्राहकांनी आपले थकीत विजबिल एकूण रक्कम ११ हजार ७३० रुपये महावितरण उपविभाग कार्यालय पोंभुर्णा येथे येऊन भरले.

रोहित्र लावण्यासाठी त्याठिकाणी जाण्यास कोणताही रस्ता नसल्याने व पोंभूर्णा ते जुनगाव असा ३० किलोमीटरचा कच्च्या रस्त्याचा खडतर मार्ग असल्याने शेवटी दुथडी वाहणाऱ्या वैनगंगा नदीच्या पात्रातून डोंग्यामधून मेसर्स धकाते इलेक्ट्रिकलस कंत्राटदारांचे मजूर व महावितरणचे तंत्रज्ञ संतोष वाढई व कंत्राटी तंत्रज्ञ राऊत यांच्या मदतीने नवीन २५ के.व्ही.ए. क्षमतेचे रोहित्र डोंग्यामधून वाहून नेउन बिघडलेले रोहित्र तातडीने बदलविण्यात आले. कृषिपंप ग्राहकांचा विजपुरवठा पूर्वरत सुरू झाल्याने आपल्या शेतीच्या धान रोवणीच्या कामास मदत झाल्याने शेतकऱ्यांनी महावितरण प्रति कृतज्ञता व्यक्त केली.

कुणाल पाटील यांनी व त्यांच्या चमूने केलेल्या या कामाबद्दल प्रसिद्ध बातम्यांची दखल घेत उर्जामंत्र्यांनी त्यांचे कौतुक ट्विट व फेसबुक पोस्टच्या माध्यमातून केले आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील या कौतुकास्पद कामाची दखल घेतल्याबद्दल मुख्य अभियंता सुनील देशपांडे यांनी मा. ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांचे आभार मानले आहेत.

“भविष्यातही महावितरण चंद्रपूर परिमंडळाचे अधिकारी व कर्मचारी अशीच ग्राहकांभिमूख कामे करीत राहतील आणि कृषी पंप वीज जोडणी धोरणाची अंमलबजावणी करू,” अशी ग्वाही मुख्य अभियंता देशपांडे यांनी दिली आहे.

कुणाल पाटील व त्यांच्या चमूने मुख्य अभियंता सुनिल देशपांडे व अधिक्षक अभियंत्या श्रीमती. संध्या चिवंडे यांनी कौतूक केले आहे.