Site icon Krishi Pandhari | कृषी पंढरी

तुकाराम मुंढे यांची नव्या जागी नियुक्ती रखडली

नागपूर महापालिकेचे आयुक्त  तुकाराम मुंढे यांची महाराष्ट्र जीवन प्राधिकरण येथे सदस्य सचिव म्हणून बदली झाली होती. मात्र राज्य सरकारने अवघ्या १५दिवसात हे आदेश मागे घेतले आहेत. तुकाराम मुंढे यांची २६ऑगस्टला मुंबईत बदली करण्यात आली होती, तर त्यांच्याकडे असलेल्या नागपूर महापालिका आयुक्तपदाचा कारभार राधाकृष्णन बी. यांच्याकडे सोपवण्यात आला होता. तुकाराम मुंढे यांना बदलीनंतर देण्यात आलेल्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या सदस्य सचिव पदाचा अतिरिक्त कार्यभार किशोर राजे निंबाळकर यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. निंबाळकर हे मदत व पुनर्वसन विभागाचे सचिव म्हणून कार्यरत आहेत.

आज करण्यात आलेल्या सनदी अधिका-यांच्या बदल्यांमध्ये किशोर राजे निंबाळकर सचिव, मदत व पुनर्वसन यांना सदस्य सचिव, यांच्याकडे तुकाराम मुंढे यांच्याबदलीचे आदेश रद्द करून महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मुंबई या पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे. तर एम. जे. प्रदीप चंद्र यांची नियुक्ती व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य खनिकर्म महामंडळ नागपूर या रिक्त पदावर करण्यात आली आहे. ई रवींद्रन यांची नियुक्ती सह विक्रीकर आयुक्त, विक्रीकर विभाग, मुंबई या पदावर करण्यात आली आहे.

दरम्यान नागपुरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना तुकाराम मुंढे यांनी महापालिका आयुक्त म्हणून कडक निर्बंध आणल्याचे दिसत होते. मात्र यावरुनच महापौर आणि भाजप नेते संदीप जोशी यांच्याशी मुंढे यांचे तीव्र मतभेद पाहायला मिळाले. कर्तव्यदक्ष आयएएस अधिकारी अशी ओळख असलेले तुकाराम मुंढे वर्षाच्या सुरुवातीला राज्याच्या एड्स नियंत्रण प्रकल्पाचे संचालक म्हणून काम पाहत होते. जानेवारी महिन्यातच नागपूरचे महापालिका आयुक्त म्हणून बदली झाली होती. त्यानंतर अवघ्या सात महिन्यात त्यांच्या बदलीचे पुन्हा एकदा आदेश निघाले होते. आता त्याला पुन्हा एकदा ब्रेक बसला आहे.

Exit mobile version