पाटणा (बिहार) ते पांडू(गुवाहाटी) पर्यंत अन्नधान्याची जहाजाद्वारे वाहतूक

यामुळे, शेतकऱ्यांना आपल्या मालविक्रीची व्याप्ती वाढवता येईल, तसेच धान्याच्या उत्तम किमती आणि जीवनमान उंचावल्यामुळे शेतकरी आत्मनिर्भर होण्यास मदत होईल- गोयल

बिहारच्या पाटणामधून गुवाहाटीच्या पांडू बंदरांपर्यंत, जहाजाने अन्नधान्याची वाहतूक करण्याच्या प्रायोगिक उपक्रमामुळे याद्वारे ईशान्य भारतासाठीचा एक नवा मार्ग खुला होईल, असे मत, केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण, वस्त्रोद्योग तसेच वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी व्यक्त केले. पाटणा इथून पांडू कडे धान्यसामुग्री घेऊन जाणारे व्यापारी जहाज, एम व्ही लाल बहादूर शास्त्री जहाजाला आज त्यांनी आभासी पद्धतीने हिरवा झेंडा दाखवून रवाना केले.

तसेच कालूघाट (बिहार) इथल्या नव्या टर्मिनलच्या पायाभरणीचा समारंभ त्यांच्या हस्ते झाला, त्यावेळी ते बोलत होते. या, 2,350 किमीच्या प्रवासामुळे,  ईशान्य भारताचा गेट वे समजल्या जाणाऱ्या आसामसाठी नवा मार्ग खुला होईल, आणि गंगा तसेच ब्रह्मपुत्रा नदीमधून ईशान्य भारतात जलमार्गे निर्वेध वाहतुकीचा मार्ग प्रस्थापित होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

लाल बहादूर शास्त्री यांचे नाव असलेल्या या जहाजामुळे आपल्याला शास्त्रीजींच्या ‘जय जवान, जय किसान’ या घोषणेचे स्मरण होते, असे सांगत ते पुढे म्हणाले, “या प्रयोगामुळे, शेतकऱ्यांच्या मालविक्रीच्या कक्षा रुंदावतील, त्यांच्या मालाला चांगली किंमत मिळेल त्यातून त्यांचे जीवनमान सुधारेल, पर्यायाने शेतकरी आत्मनिर्भर होण्यास मदत होईल”.

हा उपक्रम म्हणजे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘अॅक्ट ईस्ट’ धोरण आणि बिहार तसेच ईशान्य भारताच्या एकात्मिक विकासाच्या धोरणाच्या समन्वयाचे उत्तम उदाहरण आहे, असेही त्यांनी सांगितले.

जलमार्ग पायाभूत सुविधा आणि त्याची संपूर्ण व्यवस्था विकसित करण्यासाठी  केंद्र सरकारने हाती घेतलेल्या चार महत्वाच्या पावलांची त्यांनी माहिती दिली. या प्रयत्नातून देशांतर्गत जलमार्ग मालवाहतुकीत वाढ करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे, असे ते म्हणाले. देशाची आर्थिक वृद्धी आणि शाश्वत प्रगतीसाठी पीएम गतिशक्ती योजनेअंतर्गत असलेल्या सात इंजिनपैकी, जलमार्ग वाहतूक एक आहे, असेही गोयल यावेळी म्हणाले.