Site icon Krishi Pandhari | कृषी पंढरी

‘ट्रॅक्टर आमचा डिझेल तुमचे योजना’ सुरु

निराधार महिला शेतकऱ्यांसाठी खास उपक्रम

अमरावती, दि. १६ : अचलपूर विभागातील निराधार, विधवा, परितक्त्या आणि आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील महिलांना आधार मिळावा म्हणून राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या पुढाकाराने ‘ट्रॅक्टर आमचा डिझेल तुमचे’ ही योजना राबविण्यात येत आहे.

शेतकरी कुटुंबात पतीच्या निधनानंतर कुटुंबाचा चरितार्थ चालविण्याची वेळ महिलांवर येते, पण नांगरणी, वखरणी, व्ही पास, पंजी व पावसाळा सुरू झाल्यावर पेरणीसाठी पैसा आणायचा कुठून, अशा विवंचनेत या महिला भगिनी असतात. नेमकी ही बाब राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या लक्षात येताच त्यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीदिनी ‘ट्रॅक्टर आमचा डिझेल तुमचे’ ही योजना जाहीर केली. राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या मातोश्री श्रीमती इंदिराआई कडू यांच्या वाढदिवशी या योजनेचा शुभारंभ करण्यात आला.

या योजनेची नोंदणी अचलपूर विभागातील गावांमध्ये सुरू करण्यात आली व अजूनही सुरू आहे. आतापर्यंत  सुमारे 100 एकर पेक्षा जास्त शेतीची कामे या योजनेतून करून देण्यात आली आहे. तसेच पावसाळ्यापूर्वी सर्व गावांत ही कामे पूर्ण करून त्या महिला व त्यांच्या कुटुंबियांना शेतीसाठी मोठा आधार योजनेतून मिळत आहे. या योजनेद्वारे अत्यल्प दरात शेतीची कामे पूर्ण होत आहेत.

Exit mobile version