शेतकऱ्यांनी सुरू केल्या औजार बँक; मंत्री चव्हाण यांच्या हस्ते लोकार्पण

स्वातंत्र्याच्या आमृत महोत्सवी वर्षानिमित्त शेतकरी गट, महिला शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी यांच्या 75 औजारे बँकांचे लोकार्पण राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. यावेळी रहाटी येथील महालक्ष्मी महिला शेतकरी बचतगट यांना ट्रॅक्टरची चावी देवून 75 औजारे बँकेचे लोकार्पण करण्यात आले. तसेच मुखेड तालुक्यातील होनवडज शेतकरी गटालाही ट्रॅक्टरची चावी देण्यात आली.

पालममंत्री अशोक चव्हाण यांनी नानाजी देशमुख कृषि संजिवनी प्रकल्प व मानव विकास मिशन या योजनेतून  यावर्षात कृषि विभागाकडून 75 औजारे बँक स्थापन करण्याबाबत सुचना दिल्या होत्या. त्यानुसार जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या मार्गदर्शनाखाली कृषि विभागाने 75 औजारे बँक वाटप केले. ज्यात ट्रक्टर, ट्रॉलरी, बीबीएफ पेरणी यंत्र, रोटाव्हेटर, मळणी यंत्र, नांगर आदी औजारांचा समावेश आहे. एका औजारे बँकेची किंमत 20 लाख रुपये असून मानव विकास मिशन मधुन 75 टक्के अनुदानावर 10 महिला शेतकरी गटांना औजारे बँक देण्यात आली. तसेच 65 औजारे बँक नानाजी देशमुख कृषि संजिवनी प्रकल्प या योजनेतून शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपन्या यांना देण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते 25 नवीन औजारे बँकांना मंजूरी देण्यात आली.

या सोहळ्यास आमदार अमर राजुरकर, माजी राज्यमंत्री डी. पी. सावंत, महापौर जयश्री पावडे, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, मनपा आयुक्त डॉ.  सुनिल लहाने, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी आर. बी. चलवदे, देगलूरचे उपविभागीय कृषि अधिकारी एस. बी. शितोळे, कृषि अधिकारी प्रकाश पाटील, सतिश सावंत, मनोज लांबडे, बालाजी बच्चेवार तसेच कृषि विभागातील अधिकारी-कर्मचारी व महिला शेतकरी उपस्थित होते.