बर्ड फ्लू बाबत अशी आहे देशातली स्थिती

देशातल्या नऊ राज्यांमधल्या विविध कुक्कुटपालन केंद्रांमध्ये प्राण्यांना एव्हियन एनफ्लूएन्झा झाल्याचे दि. 27 जानेवारी, 2021 पर्यंत लक्षात आले आहे. यामध्ये केरळ, हरियाणा, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, छत्तीसगड, उत्तराखंड, गुजरात, उत्तर प्रदेश आणि पंजाब या राज्यांमधल्या कुक्कुटपालन केंद्रांचा समावेश आहे. त्याचबरोबर मध्य प्रदेश, हरियाणा, महाराष्ट्र, छत्तीसगड, हिमाचल प्रदेश, गुजरात, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, दिल्ली, राजस्थान, जम्मू आणि काश्मिर आणि पंजाब या 12 राज्यांमध्ये कावळ्यांना तसेच स्थलांतरित पक्षी, वन्यपक्षी यांनाही एव्हियन एनफ्लूएन्झा झाल्याची पुष्टी करण्यात आली आहे.

महाराष्ट्रातल्या नांदेड, सोलापूर, पुणे, अहमदनगर, बुलढाणा, अकोला, नाशिक आणि हिंगोली या जिल्ह्यातल्या कुक्कुटपालन केंद्रामधील नमूने घेण्यात आले असून तेथील प्राण्यांनाही रोगाची लागण झाल्याची पुष्टी झाली आहे. गुजरातमधल्या भावनगर जिल्ह्यात आणि छत्तीसगडमधल्या धमतरी जिल्ह्यातही प्राण्यांना हा फ्लू झाल्याची पुष्टी करण्यात आली आहे.

उत्तराखंडमध्ये रूद्रप्रयाग वन विभागाअंतर्गत क्षेत्रातल्या कावळ्यांना, गुजरातमधल्या जुनागड येथे तितर पक्षांना तसेच महाराष्ट्रातल्या बीड जिल्ह्यात मोरांमध्ये या रोगाची बाधा झाल्याची पुष्टी करण्यात आली आहे.

महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगड, पंजाब, उत्तर प्रदेश आणि गुजरात या राज्यांमधल्या बाधित केंद्रावर आणि भागांमध्ये रोग नियंत्रण, संक्रमण प्रसार रोखण्याचे काम सुरू केले आहे. त्याचबरोबर कुक्कुटपालन केंद्रांची स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण केले जात आहे. या सर्व राज्यांमधल्या परिस्थितीवर अतिशय बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. तसेच कुक्कुटपालन केंद्रांव्यतिरिक्त इतर जातीच्या पक्षांचेही नमुने तपासण्यात येत आहेत.

राज्याच्या कृती दलाने केलेल्या कारवाईनुसार ज्या कुक्कुटपालन केंद्रांमधल्या प्राण्यांची, अंड्याची विल्हेवाट लावण्यात आली, त्यांचे झालेले नुकसान लक्षात घेवून केंद्रचालकांना, शेतक-यांना नुकसान भरपाई देण्यात येत आहे. पशुसंवर्धन आणि दुग्धविकास विभागाच्यावतीने नुकसान भरपाईपैकी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना 50 टक्के निधी दिला आहे. महाराष्ट्र सरकारने बर्ड फ्लू रोग नियंत्रण कार्यक्रम सुरू केला आहे.  त्यानुसार कुक्कुटपालन केंद्रे आणि इतर पक्षी, अंडी आणि कुक्कुटपालन खाद्य तसेच संक्रमण झालेल्या परिसरात एक किलोमीटर परिघामध्ये रोग नियंत्रणासाठी 130 लाख रुपयांचे नुकसान भरपाई पॅकेज मंजूर केले आहे.

सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश एव्हियन फ्लू 2021 च्या प्रतिबंधासाठी करीत उपाय योजना, सुधारित कृती आराखडा यांच्या माहितीचा अहवाल विभागाला नियमित पाठवित आहेत. एव्हियन फ्लूविषयी जनजागृती करण्यासाठी विभागाच्यावतीनेही प्रयत्न करण्यात येत आहेत. यासाठी व्टिटर, फेसबुक यासारख्या समाज माध्यमांचा वापर करण्यात येत आहे.