देशभरात कोरोनाचा कहर पाहायला मिळत असताना, एक दिलासादायक बातमी आहे. त्यानुसार यंदा मान्सून सामान्य राहणार आहे. मान्सूनचा अंदाज स्कायमेट या खासगी हवामान संस्थेने वर्तविला आहे. देशात यंदा सरासरीच्या 103 टक्के पर्जन्यमानाचा अंदाज स्कायमेटने वर्तविला आहे. स्कायमेटच्या अंदाजानुसार यंदा देशात मान्सून सामान्य राहिल. दक्षिण पश्चिम मान्सून जून ते सप्टेंबर या चार महिन्यात बरसतो. केरळमधून मान्सूनला सुरुवात होऊन, पुढे तो देशभर पसरतो. आयएमडीच्या या अंदाजाने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
सध्या देश कोरोनाच्या संकटात असल्याने सर्व व्यवहार ठप्प आहेत. कृषी कामांना परवानगी असली तरी त्यासंबंधी व्यवहार काहीसे बंद असल्याने त्याचा फटका शेतीला बसला आहे. यंदा दुष्काळाची शक्यता शून्य टक्के इतकी आहे. तर एकूण मान्सून कालावधीत सरासरीपेक्षा जास्त पर्जन्यमानाची शक्यता 60 टक्के असल्याने पाऊस चांगलाच राहण्याची शक्यता आहे. मान्सूनच्या चार महिन्यांपैकी जूनमध्ये सरासरीच्या 106 टक्के पर्जन्यमानाचा, जुलैमध्ये सरासरीच्या 97 टक्के पर्जन्यमानाचा, ऑगस्टमध्ये सरासरीच्या 99 टक्के पर्जन्यमानाचा, तर सप्टेंबरमध्ये सरासरीच्या 116 टक्के पर्जन्यमानाचा अंदाज स्कायमेटने वर्तविला आहे.
देशात यंदा जून ते सप्टेंबर या मान्सूनच्या चार महिन्यांमध्ये एकूण सरासरीच्या 103 टक्के पर्जन्यमानाचा अंदाज स्कायमेटने वर्तविला आहे. यात 5 टक्के कमी वा अधिक होऊ शकतात. मान्सूनच्या चार महिन्यांपैकी सप्टेंबरमध्ये सरासरीपेक्षा सर्वात जास्त पावसाचा अंदाज स्कायमेटने वर्तविला आहे. स्कायमेटचे अध्यक्ष जी पी शर्मा यांनी याविषयीची माहिती दिली आहे.