परभणी कृषि विद्यापीठाचे संशोधनात्‍मक कार्य कौतुकास्पद

बारामती कृषि विकास प्रतिष्‍ठानचे अध्‍यक्ष मा श्री राजेंद्र पवार यांची वनामकृविस सदिच्‍छा भेट

शेती व शेतकरी विकासाकरिता कृषि संशोधनाला पर्याय नाही. मर्यादित निधीमुळे संशोधनाचा प्राधान्‍यक्रम आपणास ठरवावा लागतो. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ विकसित कोरडवाहु शेतीस अनुकूल विविध पिकांचे वाण व इतर तंत्रज्ञान निश्चितच उपयुक्‍त असुन विद्यापीठाचे संशोधनात्‍मक कार्य कौतुकास्‍पद आहे. आहारात बाजरी, ज्‍वारी, जवस आदी दुय्यम कडधान्‍याचे महत्‍व वाढत असतांना परभणी विद्यापीठाने या पिकांचे चांगले वाण विकसित केले आहेत. विद्यापीठ विकसित तुरीचा बीडीएन ७११, ज्‍वारीचे परभणी सुपर मोती, परभणी शक्‍ती, करडईचा पीबीएनएस १२ हे वाण चांगले उत्‍पादनक्षम असुन बीडीएन ७११ वाणापासुन अनेक कोरडवाहु शेतकरी बांधवाचे उत्‍पन्‍न वाढण्‍यास मदत होणार आहे, असे प्रतिपादन बारामती बारामती कृषि विकास प्रतिष्‍ठानचे अध्‍यक्ष मा श्री राजेंद्र पवार यांनी केले.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्‍या संशोधन कार्याची माहिती घेण्‍याकरिता दिनांक १७ डिसेंबर रोजी त्‍यांनी सदिच्‍छा भेट दिली, त्‍याप्रसंगी बोलत होते. यावेळी विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर यांनी विद्यापीठ संशोधन कार्याची माहिती दिली. भेटी दरम्‍यान शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले, प्राचार्य डॉ उदय खोडके, प्राचार्य डॉ जयश्री झेंड, प्राचार्य डॉ अरविंद सावते, प्रगतशील शेतकरी श्री संभाजीराव धांडे, बारामती कृषि विज्ञान केंद्राचे डॉ संतोष कारंजे, डॉ डॉ के टी जाधव आदींसह विद्यापीठातील संशोधक व अधिकारी उपस्थित होते.

मा श्री राजेंद्र पवार म्‍हणाले की, पश्चिम महाराष्‍ट्रातील कोरडवाहु क्षेत्रात परभणी विद्यापीठ विकसित अनेक कृषि तंत्रज्ञानाचा चांगला लाभ होऊ शकतो. विद्यापीठाने शेतकरी बांधवाच्‍या गरज लक्षात घेऊन विकसित कृषि अवचारे व यंत्रे यात बैलचलित तसेच सौर उर्जावरील अवचारे, बीबीएफ यंत्र याचा निश्चितच शेतकरी बांधवाना लाभ होणार आहे. परभणी येथील गृहविज्ञानाशी संबंधीत एकमेव सामुदायिक विज्ञान महाविद्यालय ग्रामीण महिला, बालविकास व किशोरवयीन मुलींच्‍या विकासाकरिता कार्य करत आहे. विद्यापीठ विकसित कृषि तंत्रज्ञान जास्‍तीत जास्‍त शेतक-यांपर्यंत चांगल्‍या प्रकारे पोहचले पाहिजे, असे मत त्‍यांनी व्‍यक्‍त केले.

यावेळी त्‍यांनी विद्यापीठातील कोरडवाहु शेती संशोधन प्रकल्प, पशुशक्‍तीचा योग्‍य वापर प्रकल्‍प, बायोमिक्‍स प्रकल्‍प, सामुदायिक विज्ञान महाविद्यालय, अन्‍नतंत्र महाविद्यालय आदी प्रकल्‍पास भेट देऊन संशोधनाची माहिती घेतली. भेटी दरम्‍यान बांबु लागवड संशोधनाबाबत डॉ डब्लु एन नारखेडे, कुपनलिका पुनर्भरण तंत्रज्ञानाबाबत डॉ मदन पेंडके, पशुशक्‍तीचा योग्‍य वापर तंत्रज्ञान व कृषि औजाराबाबत डॉ स्मिता सोळंकी, सौर उर्जेचे वापराबाबत डॉ राहुल रामटेके, गृहविज्ञान तंत्रज्ञानाबाबत डॉ जयश्री झेंड, प्रक्रिया अन्‍न पदार्थाबाबत डॉ अरविंद सावते, विद्यापीठ विकसित बॉयोमिक्‍स बाबत डॉ कल्‍याण आपेट यांनी माहिती दिली. सुत्रसंचालन डॉ ऋषिकेश औंढेकर यांनी केले. कार्यक्रमास विद्यापीठातील संशोधक व अधिकारी उपस्थित होते.