लॉकडाऊनच्या काळातील उत्पादित दूध भुकटी आणि बटर महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघ (महानंद) यांना वर्किंग स्टॉक म्हणून देण्याचा निर्णय आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते.
लॉकडाऊनमध्ये प्रतिदिन 10 लाख लिटर दूध शेतकऱ्यांकडून घेऊन त्याचे रुपांतरण दूध भुकटीमध्ये करण्याची योजना राबविण्यात आली होती. या योजनेत 7 हजार 764 मे.टन दूध भुकटीचे उत्पादन झाले. यापैकी 1500 मे.टन दूध भुकटी डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम अमृत आहार योजनेत देण्यात आली असून उर्वरित 6 हजार 264 मे.टन भुकटीपैकी 3017 मे.टन भुकटी एनसीडीएफआय पोर्टलवर विक्री करण्यात आली आहे. महानंदकडे आता या योजनेंतर्गत 3247 मे.टन इतकी भुकटी शिल्लक आहे. याशिवाय 4044 मे.टन देशी कुकींग बटर पैकी 3585 मे.टन बटर विकण्यात आले असून 459 मे.टन बटर शिल्लक आहे. शिल्लक राहिलेली भुकटी व बटर हे महानंदला वर्किंग स्टॉक म्हणून व्यवसायासाठी देण्याचा निर्णय घेण्यात आला.