विधानमंडळाच्या पावसाळी अधिवेशनास आजपासून सुरूवात झाली. विधानसभेत वंदे मातरम्ने सकाळी 11 वाजता कामकाजास सुरुवात झाली. विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह सन्माननीय मंत्री आणि विधानसभा सदस्य उपस्थित होते. विधानपरिषदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या कामकाजाला वंदे मातरम्ने सुरुवात झाली. यावेळी सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, संसदीय कार्यमंत्री अनिल परब, राज्यमंत्री गृह (शहरे) सतेज ऊर्फ बंटी डी. पाटील, महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार, शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू, कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम, वित्त व गृहराज्यमंत्री (ग्रामीण) शंभुराज देसाई, विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यासह विधानपरिषदेतील सदस्य उपस्थित होते.
विधानसभा तालिका सभापतींची नियुक्ती
विधानसभा सदस्य सर्वश्री भास्कर जाधव, दिलीप बनकर, कालिदास कोळंबकर आणि कुमारी प्रणिती शिंदे यांची विधान सभा तालिका अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. विधान सभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी आज या सदस्यांची निवड विधानसभेत जाहीर केली.
विधानपरिषद तालिका सभापतींची नियुक्ती
पावसाळी अधिवेशनासाठी सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी विधानपरिषदेच्या तालिका सभापतीपदी सदस्य सर्वश्री डॉ.रणजित पाटील, डॉ.मनीषा कायंदे, अरुण लाड आणि डॉ. वजाहत मिर्झा यांची नियुक्ती केली.