गर्भवती मातांची काळजी घेण्यासाठी अनेक प्रकारचे उपक्रम आरोग्य खात्याकडून राबविले जातात. यामध्ये प्राधान्याने गर्भवती मातांची गाव स्तरावर आरोग्य यंत्रणेकडे नोंद व्हावी म्हणून आशा कार्यकर्तीमुळे नोंद करण्याची सोय झाली आहे. आज प्रत्येक गावात आशा कार्यकर्तीची नियुक्ती केली आहे. त्यामुळे गर्भवती मातेची काळजी आणि लोहयुक्त गोळ्या देण्याबाबत सुलभता आली आहे. गर्भवती मातेचा प्रसूतीकाळ येईपर्यंत आशा कार्यकर्ती आणि गावातील परिचारिका मातेचे वाढते वजन आणि औषधाचा पुरवठा करतात. जननी सुरक्षा योजना ही मुख्यत: गरीब व मागासवर्गीय कुटुंबांसाठी आहे.
होणारे बाळ आणि आई राहते सुरक्षीत-
त्यानंतर गर्भवती मातेची प्रसूती ही रुग्णालयात व्हावी या दृष्टीने आरोग्य यंत्रणा तयार असते. या सर्व गोष्टीचा एकत्रित परिणाम म्हणून संस्थात्मक प्रसूतीचे प्रमाण शंभर टक्क्यापर्यंत जाऊन पोहोचले आहे. संस्थात्मक प्रसूतीमुळे प्रत्येक गर्भवती मातेला प्रसूतीच्या वेळी कोणतीही गुंतागुंत झाल्यास तातडीने जीव वाचवणारे उपाय करणे शक्य होऊ लागले आहे. त्यासाठी ॲम्ब्युलन्स सेवेचा वापर प्रभावी होत आहे. संस्थात्मक प्रसूतीचे प्रमाण वाढवण्यासाठी गर्भवती मातांना केवळ औषधोपचार व सुरक्षित प्रसूती एवढेच मुद्दे महत्त्वाचे नाही. प्रसूती झाल्यानंतर तिला चांगल्या पोषण आहाराची गरज असते.
पैसा नाही, काळजी नको-
मात्र अनेकवेळा कुटुंबियांकडे प्रसूतीमुळे मातेच्या प्रकृतीत झालेली झीज भरून काढण्यासाठी पैसा उपलब्ध नसतो. अशा परिस्थितीत दारिद्र्य रेषेखालील लाभार्थी असो की अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातील लाभार्थी एवढेच नव्हे तर अंत्योदय योजनेत असलेल्या महिलेला पोषण आहारासाठी विशिष्ट रक्कम देण्याची सोय शासनाने केली आहे. जननी सुरक्षा योजनेत ही रक्कम प्रत्येक मातेला प्रसूतीच्या वेळी दिली जाते. यातून या मातेला पौष्टिक आहार खाण्याची सोय होते. प्रसूतीसाठी आलेल्या मातांना या योजनेचा लाभ मिळतो. पाचशे रुपयांपासून सातशे रुपयांपर्यंत ही रक्कम दिली जाते. तसेच त्यासाठी निधी देखील प्रत्येक जिल्हास्तरवरील यंत्रणेला वर्षाच्या सुरुवातीलाच दिला जातो. त्यामुळे प्रसूतीच्या वेळी ही मदतीची रक्कम देण्याची सोय सहजपणे होते.
कुणाशी करावा संपर्क-
आशा कार्यकर्ती किंवा जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात आपल्याला या योजनेसाठी संपर्क साधता येईल.