कोंबड्याच्या अंडी उबवण केंद्रात जन्माला आला मोर

देशाचा राष्ट्रीय पक्षी असलेल्या मोराची अंडी कृत्रिमरीत्या इनक्यूबेटरमध्ये उबवून पिलांना जन्म देण्याचा प्रयोग यशस्वी झाला आहे. अंडी उबवण केंद्रात प्रथमच लांडोरीच्या अंड्यांपासून 4 मोरांच्या पिल्लांचा जन्म झाल्याची ही  घटना पुरंदर तालुक्यात घडली आहे. .

वनविभाग आणि इला फाउंडेशनतर्फे चाललिण्यात येणा-या पुरंदर तालुक्यातील पिंगोरी येथील ‘इला ट्रांझिट ट्रीटमेंट सेंटरमध्ये ही किमया करण्यात या सेंटरला यश आले आहे. विणीच्या हंगामात लांडोर फार सावध असतात. त्या शेताच्या बांधावर, माळरानावर अंडी घालतात.

तसेच त्या काटेरी वनस्पतींमध्येही हे अंडे लपवतात. जर ते अंडे नागरिकांना सापडले किंवा त्यांना त्रास झाला तर लांडोर ते अंडी सोडूनही देतात. वन्यजीव संरक्षण कायदा 1972 अंतर्गत मोर पक्षाचे अंडी हाताळण्यास प्रतिबंध आहे.

दरम्यान, इला फाउंडेशनच्या तज्ज्ञांनी इला ट्रांझिट सेंटर येथे कृतिमरित्या उबवण पेटीमध्ये (इनक्यूबेटर) ही अंडी ठेवली आणि त्यातून मोरांना जन्म देण्यात यश मिळवले आहे. कोंबडीचे अंडी उबवण्याबाबतचे हे एक अधिकृत इन्क्युबेशन सेंटर आहे.

आम्हाला या अंडी उबवण केंद्रात 4 मोराची अंडी पूर्णपणे उबवण्यात यश आले असून देशात प्रथमच घडले आहे. नागरिकांना आमचे आवाहन आहे की, अशाप्रकारे अंडी शेतात आढळून आल्यानंतर त्यांनी वनविभाग किंवा आमच्याशी संपर्क करा, स्वतः अंडी हाताळू नका, असे इला फाऊंडेशनचे संचालक डॉ. सतीश पांडे यांनी सांगितले आहे.