राज्यात सध्या कोरोना रुग्णांची संख्या वाढत असली तरी मृत्यूदर मात्र गेल्या आठवड्याच्या तुलनेत कमी झाला आहे. गेल्या एक वर्षाची तुलना केल्यास तो त्यापेक्षा कमी असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. पुणे जिल्ह्यात हा मृत्यूदर केवळ ०.३ टक्के झाला आहे.
पुणे जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या बुधवारी २८१३ इतकी होती. गेल्या वर्षाच्या २६ मेनंतरची ही सर्वाधिक रुग्णसंख्या आहे. त्यावेळी पुणे जिल्ह्यात २९९९ रुग्ण आढळले होते. बुधवारी मात्र, केवळ एका रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
राज्यातही मंगळवारच्या तुलनेत तब्बल ४६ टक्के रुग्ण वाढ दिसून आली असून बुधवारी २६५३८ कोरोनाबाधित आढळले. मंगळवारी हीच संख्या १८४६६ इतकी होती. राज्यात गेल्या वर्षी २६ मे रोजी २६६७२ रुग्ण आढळले होते. त्यानंतर काल बुधवारी आढळलेले रुग्ण हे सर्वाधिक होते.
एककीडे रुग्णसंख्या वाढत असली तरी दुसरीकडे मृत्यूंची संख्या एक आकडी झाली आहे. राज्यात बुधवारी केवळ ८ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. मुंबईत ही संख्या केवळ ३ होती तर पुण्यात केवळ एका मृत्यूची नोंद झाली.
पुण्याचा विचार करता ९ ते १५ डिसेंबर या आठवड्यात १५ कोरोना मृत्यूंची नोंद झाली होती. या काळात मृत्यूदर हा १.१ टक्के होता. १६ ते २२ डिसेंबर या काळात ही संख्या ८ इतकी झाली होती. तर मृत्यूदर ०.५ टक्के झाला होता. २३ ते २९ डिसेंबर या कालावधीत १४ मृत्यू झाले तर मृत्यूदर ०.७ टक्के होता. आणि ३० डिसेंबर ते ३ जानेवारी या आठवड्यात १२ जणांचा मृत्यू झाला तर मृत्यूदर ०.३ टक्के झाला आहे.
याबाबत पुणे विभागाचे सहाय्यक वैद्यकीय संचालक डॉ. संजय देशमुख म्हणाले, “पुणे जिल्ह्यात २५ डिसेंबरपासून दररोज सरासरी किमान २०० रुग्ण वाढत होते. हा आकडा आता १००० ते २००० इतका झाला आहे. परंतु रुग्णालयांमध्ये दाखल होण्याचे प्रमाण त्या वेगाने वाढलेले नाही. बहुतेक रुग्ण हे लक्षणेविरहित किंवा सौम्य लक्षणांचे आहेत. रुग्ण सौम्य लक्षणांचे असल्याने मृत्यूदरात वाढ होण्याची शक्यता अल्प आहे.”