कृषि विद्यापीठास विविध पिकांच्या वाण विकसित करण्यासाठी सहा ते सात वर्षापेक्षा जास्त कालावधी लागतो, हेच वाण बदलत्या हवामानात कालबाहयही होत आहेत, त्यामुळे वाण विकसित करण्याचा संशोधन कालावधी कमी करण्याची गरज आहे. शेतकरी बांधवाचे उत्पन्न वाढीकरिता शेतमाल प्रक्रियावर भर दयावा लागेल तसेच उत्पादन वाढीबरोबरच शेतीत कमी खर्चिक विद्यापीठ निर्मित तंत्रज्ञानाचा अवलंब वाढवावा लागेल, असे प्रतिपादन डॉ पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ विलास भाले यांनी केले.
महाराष्ट्रातील चारही कृषि विद्यापीठांनी केलेले संशोधन शेतक-यांपर्यंत पोहोचविण्यासाठी महत्वाचा टप्पा मानल्या जाणा-या संयुक्त कृषि संशोधन व विकास समितीची ४९ वी बैठकीचे आयोजन दिनांक २४ ते ३० डिसेंबर दरम्यान आभासी माध्यमातुन वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी व महाराष्ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषद, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले असुन सदरिल बैठकीच्या उद्घाटनाप्रसंगी दिनांक २४ डिसेंबर रोजी अध्यक्षीय भाषणात ते बोलत होते.
सदरिल बैठकीस राज्याचे प्रधान सचिव (कृषि) मा श्री एकनाथ डवले, कृषि परिषदेचे महासंचालक मा श्री विश्वजीत माने, स्वागताध्यक्ष वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. अशोक ढवण, दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषि विद्यापीठाचे कुलगुरु मा. डॉ. संजय सावंत, राहुरी येथील महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु मा. डॉ. प्रशांतकुमार पाटील, वनामकृविचे संशोधन संचालक डॉ दत्तप्रसाद वासकर, डॉ पंदेकृविचे संशोधन संचालक डॉ व्ही के खर्चे, डॉ बासाकोकृविचे संशोधन संचालक डॉ पी एम हाळदनकर, मफुकृविचे संशोधन संचालक डॉ एस आर गडाख, कृषि परिषदेचे संशोधन संचालक डॉ हरिहर कौसडीकर, शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले, विस्तार शिक्षण संचालक डॉ देवराव देवसरकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.
कुलगुरू मा डॉ विलास भाले पुढे म्हणाले की, कृषि विद्यापीठाने शेतकरी, कृषिचे विद्यार्थी, कृषि विस्तारक यांच्या कौशल्य विकासाकरिता प्रयत्न करावेत. शेतकरी बांधवाचे कृषि उत्पन्न दुप्पट करण्याच्या दृष्टीने तसेच राज्य शासनाची विकेल ते पिकेल योजना यशस्वीतेकरिता केवळ कापुस व सोयाबीन या दोन पिकांवर अवलंबुन राहुन चालणार नाही, याकरिता राज्यातील पिक लागवडीत विविध पिकांचा अंतर्भाव करावा लागेल, यात पारंपारिक पिकांचा समावेश आवश्यक आहे. आज देश खाद्यतेलाची मोठया प्रमाणात आयात करत आहे, गळीत धान्य पिक लागवडीवर भर दयावा लागेल, यात सुर्यफुल पिकाखालील लागवड क्षेत्र वाढविण्याची गरज आहे. कृषि विभाग व कृषि विद्यापीठाच्या सहकार्याने मागील दोन ते तीन वर्षात कापसावरील गुलाबी बोंडअळी व टोळ धाडीचा उद्रेक राखण्यात आपण यशस्वी झालो आहोत.
मार्गदर्शनात राज्याचे प्रधान सचिव (कृषि) मा श्री एकनाथ डवले म्हणाले की, हवामान आधारित राज्यात प्रमुख चार कृषि हवामान विभागानुसार चार विद्यापीठाची निर्मिती करण्यात आली. राज्यातील कृषि विकासात संशोधनाच्या माध्यमातुन चारही कृषि विद्यापीठाने भरीव असे योगदान दिले आहे. चारही विद्यापीठ व कृषि विभागाच्या माध्यमातुन पुढील दहा ते पंधरा वर्षाच्या कृषि संशोधनाच्या आराखडा तयार करण्याचे काम चालु आहे. शेतमाल उत्पादन वाढीमध्ये वाण निर्मितीवर अधिक भर देत आहोत, यास मर्यादा आहेत, यात पिक व्यवस्थापन तंत्रज्ञान विकसित करण्यावर संशोधनात भर दयावा लागेल. विविध पिकांपासुन मुल्यवर्धीत पदार्थ निर्मिती तंत्रज्ञान विकसित करण्याची आवश्यकता आहे. जमिनीतील कार्बनचे प्रमाण वाढीकरिता प्रयत्न करावे लागतील. लहान शेतक-यांना किफायतीशीर यांत्रिकीकरणावर संशोधनात भर दयावा लागेल, असे ते म्हणाले.
प्रास्ताविक भाषणात कुलगुरू मा. डॉ. अशोक ढवण यांनी परभणी कृषि विद्यापीठाच्या संशोधनाबाबत माहिती देऊन विद्यापीठ विकसित सोयाबीन व तुर पिकांचे अनेक वाण मराठवाडयातीलच नव्हे तर इतर राज्यातील शेतकरी बांधवामध्ये प्रचलित झाले आहेत. बदलत्या हवामानात पिकांची जुने वाण व कृषि तंत्रज्ञान कालबाहय होत असुन नवनवीन वाण व पुरक तंत्रज्ञान निर्मितीवर विद्यापीठाचा भर आहे. दर्जेदार बीजोत्पादन निर्मितीचे मुख्य उद्दीष्ट विद्यापीठाचे आहे. विद्यापीठ जैविक निविष्ठा निर्मिती करून विकेंद्रीत पध्दतीने मराठवाडयातील प्रत्येक जिल्हयात उपलब्ध करून देत आहे. आदिवासी भागातही कृषि अवजारे व कृषि तंत्रज्ञानाचा प्रसार विद्यापीठ करित असल्याचे ते म्हणाले.
कृषि परिषदेचे महासंचालक मा श्री विश्वजीत माने, राज्यातील चारही कृषि विद्यापीठाने गेल्या पन्नास वर्षाच्या कार्यकाळात सहा हजार पेक्षा जास्त कृषि संशोधन शिफारसी संशोधनाच्या माध्यमातुन दिल्या आहेत. गेल्या पाच वर्षात कृषि शिफारसी मध्ये वाढ होतांना दिसत आहेत. जैवविविधताच्या दृष्टीने राज्यातील चारही विद्यापीठाने पारंपारिक पिकांचे गावराण वाणाचे जतन करण्यावर भर देण्याचा सल्ला दिला.
मनोगतात कुलगुरु मा. डॉ. संजय सावंत यांनी हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर कमी खर्चीक हवामान केंद्रे विकसत करून गाव पातळीवर उभारण्यात यावेत असा सल्ला दिला तर कुलगुरु मा. डॉ. प्रशांतकुमार पाटील यांनी शेतकरी बांधवा किफायतीशीर डिजिटल शेती तंत्रज्ञान विकसित करण्याची गरज असल्याचे सांगितले.
संशोधन संचालक डॉ दत्तप्रसाद वासकर यांनी मान्यवरांचे स्वागत करून परभणी कृषि विद्यापीठाच्या संशोधनाची माहिती दिली. सुत्रसंचालन डॉ विणा भालेराव यांनी केले तर आभार डॉ हरिहर कौसडीकर यांनी मानले. कार्यक्रमास राज्यातील चारही कृषि विद्यापीठातील शास्त्रज्ञ व अधिकारी, कृषि विभाग व संलग्न विभागातील अधिकारी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी विद्यापीठातील शास्त्रज्ञ, अधिकारी व कर्मचारी परिश्रम घेतले, आभासी कार्यक्रमासाठी वनामकृवितील नाहेप प्रकल्पातील अधिकारी व कर्मचारी यांनी सहाय्य केले.
एक आठवडा चालणा-या सदरिल बैठकीच्या तांत्रिक चर्चासत्रात ऑनलाईन माध्यमाव्दारे चारही कृषि विद्यापीठातील साधारणत: ३०० कृषि शास्त्रज्ञ सहभाग नोंदविणार असुन चारही कृषि विद्यापीठांच्या एकुण २२० शिफारशींचे सादरीकरण करण्यात येणार असुन यात १२ विविध पिकांच्या नवीन वाण व १४ कृषि अवजारांचा समावेश आहे.