Site icon Krishi Pandhari | कृषी पंढरी

महाराष्ट्र विधानमंडळ जनतेसाठी खुले होणार

मुंबई, दि. 19 : राज्यातील पर्यटनवृद्धीसाठी लंडन आणि भारतीय संसदेच्या धर्तीवर आता महाराष्ट्र विधानमंडळही जनतेसाठी खुले करण्याचा महत्वाकांक्षी निर्णय विधानसभा अध्यक्ष नाना पटोले आणि पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी संयुक्त बैठकीत घेतला.

यासंदर्भात विधानभवन येथे विधानमंडळ सचिवालय, गृह आणि पर्यटन विभागाची संयुक्त बैठक पर्यटनमंत्री श्री.ठाकरे यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आली. या बैठकीस पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर सिंह, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक आशुतोष सलिल, सह पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपसचिव राजेंद्र जवंजाड, विधानमंडळ सचिवालयाचे उपसचिव विलास आठवले, मुख्य सुरक्षा अधिकारी महेश चिमटे आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

विधानसभा अध्यक्ष श्री.नाना पटोले म्हणाले, महाराष्ट्र विधानमंडळाला अनन्यसाधारण परंपरा लाभलेली आहे. या विधानमंडळातून अनेक दिग्गजांनी लोकसेवेची कारकीर्द गाजवली आहे. महाराष्ट्र विधानमंडळाने संमत केलेले अनेक कायदे देशपातळीवरही स्वीकारले गेले आहेत. गौरवशाली इतिहास लाभलेली वास्तू सामान्य जनतेला बघण्यासाठी खुली करणे गरजेचे आहे. त्यातून नव्या पिढीला प्रेरणा आणि दिशा मिळेल. तसेच ही वास्तू राज्यासह देश-विदेशातील पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र बनविण्याचा संकल्प करण्यात आला आहे. प्रारंभी मुंबई विधानमंडळात ही सुविधा सुरू करून कालांतराने नागपूर व पुणे येथील विधानमंडळ वास्तूही जनतेसाठी खुली करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सांगून त्यादृष्टीने सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्याचे निर्देशही श्री.पटोले यांनी दिले.

पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे म्हणाले, विधानमंडळ जनतेसाठी खुले करण्याचा हा उपक्रम अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यातून पर्यटन तसेच रोजगार निर्मितीलाही चालना मिळणार आहे. या संदर्भात पर्यटन विभागाकडून सकारात्मकदृष्ट्या सहकार्य केले जाईल. तसेच पर्यटन विभाग, विधानमंडळ सचिवालय आणि गृह विभागामार्फत यासंदर्भात संयुक्तपणे नियमावली तयार करण्यात येईल. स्वागत कक्ष, पर्यटकांचे स्क्रिनिंग, ऑनलाईन बुकिंग अशा विविध सुविधा उपलब्ध करण्याचेही निर्देश श्री.ठाकरे यांनी दिले.

Exit mobile version