भारताला मिळाला आशियातील सर्वात लांब हाय स्पीड ट्रॅक

अवजड उद्योग व सार्वजनिक उपक्रम मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज इंदूरमधील नॅट्रॅक्स – हाय स्पीड ट्रॅक (एचएसटी) चे उद्घाटन केले. हा आशियातील  सर्वात लांब ट्रॅक आहे. 1000 एकर क्षेत्रामध्ये विकसित नॅट्रॅक्स हा दुचाकी वाहनांपासून ते अवजड ट्रॅक्टर ट्रेलरपर्यंतच्या सर्व प्रकारच्या वाहनांच्या वेगवान वाहतुकीवर उपाय आहे.

जागतिक दर्जाच्या 11.3 किमी हाय स्पीड ट्रॅकच्या ई-उद्घाटन प्रसंगी बोलताना जावडेकर म्हणाले की, भारतात  वाहन निर्मिती, उत्पादन व सुट्या भागांचे केंद्र बनण्याची क्षमता आहे. ते म्हणाले, आपण ‘आत्मनिर्भर भारत’ च्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहोत आणि या दिशेने सर्वांगीण प्रयत्न केले जात आहेत. ते म्हणाले, भारताला वाहन निर्मितीचे केंद्र बनवण्याचे पंतप्रधानांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांचे मंत्रालय कटिबद्ध आहे.

 

ते  म्हणाले, वाहन आणि उत्पादन उद्योगांचा विस्तार केल्यास रोजगार निर्मितीस मदत होईल.

ते पुढे म्हणाले की, रेल्वे, महामार्ग आणि जलमार्गातील प्रकल्प जे वर्षानुवर्षे सुरू होते ते आज तीव्र राजकीय इच्छेमुळे पूर्ण होत आहेत.

या वेळी बोलतांना अवजड उद्योग व सार्वजनिक उद्योग राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल म्हणाले, सरकार, निर्मिती आणि ऑटोमोबाईल उद्योगाला प्रोत्साहन देत आहे कारण यामुळे देशाला मोठ्या प्रमाणात सक्षम बनवण्यात मदत होईल.

नॅट्रॅक्स सेंटरमध्ये कमाल वेग चाचणी, प्रवेग, स्थिर गती इंधन वापर, रियल रोड ड्राईव्हिंग सिम्युलेशनद्वारे उत्सर्जन चाचणी इत्यादी सारख्या अनेक चाचणी क्षमता आहेत आणि वाहन गतिशीलतेचे सर्वोत्कृष्टता केंद्र आहे.

 

एचएसटीचा उपयोग हाय-एंड कारच्या कमाल वेग क्षमता मोजण्यासाठी केला जातो जी कोणत्याही भारतीय टेस्ट ट्रॅकवर मोजली जाऊ शकत नाही. परदेशी OEMs भारतात अनुकूल प्रोटोटाइप कारच्या विकासासाठी नॅट्रॅक्स एचएसटीकडे उत्सुकतेने पाहत आहेत.

जगातील सर्व अति वेगवान वाहनांच्या सर्व प्रकारच्या चाचण्यांसाठी हा एक उपाय आहे. हे दुचाकी पासून अवजड ट्रॅक्टर ट्रेलर पर्यंत सर्व वाहनांच्या गरजा पूर्ण करते.