Site icon Krishi Pandhari | कृषी पंढरी

बड्या कांदा व्यापाऱ्यांना आयकर विभागाचा दणका; धाडी आणि जप्ती

प्राप्तीकर विभागाने नाशिकमध्ये तपासणी मोहीम राबविली

नाशिकमध्ये बांधकाम व्यवसायात असलेल्या विशेषतः जमीन संकलनाचे व्यवहार करणाऱ्या एका व्यक्तीच्या प्रकरणासंदर्भात प्राप्तीकर विभागाने 21 ऑक्टोबर 2021 रोजी तपास आणि जप्तीची मोहीम राबविली.

तपासणी तसेच जप्ती कारवाई दरम्यान जमिनीचे करारनामे, नोटराईज्ड कागदपत्रे आणि मालमत्ता संपादनासाठी मोठ्या प्रमाणात रोख रकमेचे हस्तांतरण दर्शविणारे इतर दस्तावेज अशी अनेक संशय निर्माण करणारी  कागदपत्रे आढळून आल्यानंतर ती ताब्यात घेण्यात आली.  घटनास्थळी असलेले संगणक तसेच मोबाईल फोन यांच्या नोंदींमध्ये देखील या  व्यवहारांची पुष्टी करणारे  डिजिटल पुरावे मिळाले आहेत.

तसेच, विविध खासगी लॉकर्स मध्ये मोठ्या प्रमाणात बेहिशेबी रोख रक्कम आढळून आली. आतापर्यंत, 23.45 कोटी रुपयांची बेहिशेबी रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. एक लॉकर प्रतिबंधात्मक आदेशाअंतर्गत सील करण्यात आला आहे.

जमिनीच्या मोठ्या पट्ट्यांच्या खरेदीसाठी बेहिशेबी उत्पन्नाची गुंतवणूक करणाऱ्या  मुख्य व्यक्तींचा देखील या प्रकरणी शोध घेण्यात येत आहे. यापैकी बहुतांश व्यक्ती महाराष्ट्रातील पिंपळगाव बसवंत भागात कांदा आणि इतर नगदी पिकांचा घाऊक व्यापार करणाऱ्या आहेत. या व्यापाऱ्यांनी मालमत्तेत गुंतवणूक करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर रोख रकमा हस्तांतरित केल्याच्या नोंदींसह गुन्ह्याची शक्यता दर्शविणारी इतर कागदपत्रे या तपासणीत आढळून आली आणि ती जप्त करण्यात आली. या तपासात अनेक बँकांची लॉकर्स सापडली असून ती सील करण्यात आली आहेत.

प्राप्तीकर विभागाच्या या तपासणी मोहिमेतून आतापर्यंत 100 कोटींहून अधिक बेहिशेबी उत्पन्न समोर आले आहे. या तपासणी मोहिमेत मिळालेले पुरावे तपासले जात असून या प्रकरणी पुढील चौकशी प्रगतीपथावर आहे.

Exit mobile version