लसीकरणाबाबत जनजागृतीसाठी मुख्याध्यपक झाले वासुदेव आणि इन्स्पेक्टर

गावात लसीकरणाच्या संदेश देणारा फलक असलेली गाडी येते…गाडीतून चक्क वासुदेव बाहेर पडतो…हातात चिपळ्या, डमरू, डोक्याला मोराची पिसे असलेला मुकुट….काही क्षणातच ‘वासुदेव आला, हो वासुदेव आला…’ असा आवाज घुमतो आणि नागरिकांची गर्दी गोळा होते…त्यानंतर सुरू होतो कोरोना लसीकरणाचा जागर… जिल्हा परीषद शाळेचे मुख्याध्यापक सचिन पत्की यांच्या अभिनव कल्पनेतून शहादा तालुक्यातील बिलाडी गावात मनोरंजनातून  लोकशिक्षण केले जात आहे.

पत्की यांनी बहुरूपी बनून ग्रामस्थांना लसीकरणाचे महत्त्व पटवून देण्याचा उपक्रम सुरू केला असून त्याला चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. गावात वैद्यकीय कर्मचारी किंवा आशा कार्यकर्ती गेल्यास ग्रामस्थ त्यांच्याशी संवाद साधत नाहीत. लसीकरणाबाबत अनेक गैरसमज असल्याने लसीकरणासाठी नोंदणी करण्यासही विरोध होतो. अशा परिस्थितीत त्यांच्याशी संवाद साधून लसीकरणाचे महत्व त्यांच्यापर्यंत पोहोचविणे गरजेचे होते. म्हणून मनोरंजनाच्या माध्यमातून ग्रामस्थ आणि आपल्यातील दरी दूर करण्याचा प्रयत्न पत्की गुरुजींनी सुरू केला.

पत्की यांना त्यांच्याच शाळेतील शिक्षक शांताराम वाडीले आणि स्मिता बुधे यांचे सहकार्य मिळत आहे. गावात हे पथक जाताच सुरूवातीस चिपळ्यांचा आवाज घुमतो आणि वासुदेवाचे गाणे सुरू होते-

‘वसुदेवाची ऐका वाणी,

कोरोनाचा नाही इलाज रंssss

लस करी काम भावा लस करी काम

लस करी काम ताई लस करी काम’

अशा शब्दात वासुदेव लसीकरणाचे महत्व समजावतो आणि मग डॉक्टरचा परिचय करून देतो. त्यांचेच सहकारी डॉक्टर बनून लसीकरणाचे महत्व सांगतात. लोकांच्या मनातील शंका दूर करण्याचा प्रयत्न करतात. परत एकदा ‘वासुदेव आला, हो वासुदेव आला…’ आवाज घुमतो आणि हे पथक गावातील पुढच्या कोपऱ्यावर जाते.

भगवान शंकराच्या रुपात ‘बम बम भोले, माझ्या भावा लस तू ले ले’ असे म्हणत लसीकणासाठी आवाहनही ते करतात. अशाप्रकारे गेल्या पाच दिवसापासून पत्की गुरुजींचे प्रयत्न सुरू आहेत. गावकऱ्यांना हसविण्यासाठी ते पोलीस इन्स्पेक्टरही बनले. संवादशास्त्रातला एकाच पातळीवरील संवादाचा सिद्धांत त्यांनी अभ्यासला नसेलही पण आपल्या अनुभवाच्या आधारे त्यांनी सुरू केलेल्या या प्रयत्नांना यश मिळते आहे.

गावात पहिल्या लसीकरण सत्रात केवळ 30 जणांचे  लसीकरण झाले. जनजागृतीमुळे गावात लसीकरण करणाऱ्यांची संख्या 135 पर्यंत पोहोचली आहे. गावातील सर्वांचे लसीकरण होईपर्यंत प्रयत्न करणार असल्याचे पत्की सांगतात. आपल्या कलेचा उपयोग लोकशिक्षणासाठी करून त्यांनी  समाजातील शिक्षकांची असलेली महत्वाची भूमीका अधोरेखित केली आहे.

यापूर्वीदेखील कोरोना काळात शिक्षण  बंद असताना त्यांनी शिक्षण रथाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचा उपक्रम राबविला. त्याच वाहनाचा उपयोग आता लसीकरणाबाबत जागृती घडविण्यासाठी करीत आहेत. शाळा परिसरात औषध फवारणी, सॅनिटायझर व साबण वाटप, मास्क वाटप अशा उपक्रमातही पत्की यांनी पुढाकार घेतला आहे.