ओमायक्रॉन विषाणूचा मुकाबला करण्यासाठी प्रशासन सज्ज

नवीन कोरोनाचा विषाणू ओमायक्रॉनचा देशासह महाराष्ट्र राज्यात शिरकाव झाल्याने ओमायक्रॉन आजाराचे रुग्ण आढळून येत आहेत. त्या अनुषंगाने नागरिकांनी सतर्क राहून शासनाने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन करावे, ओमायक्रॉन या विषाणूचा मुकाबला करण्यासाठी प्रशासन सज्ज असून नागरिकांनी देखील यासाठी माझे कुटुंब माझी जबाबदारी समजून सकारात्मक प्रतिसाद दिल्यास ओमायक्रॉन या विषाणूला हद्दपार करण्यासाठी वेळ लागणार नाही, असा विश्वास राज्याचे कृषी व माजी सैनिक कल्याण मंत्री दादाजी भुसे यांनी व्यक्त केला.

राज्यात ओमायक्रॉनच्या रुग्णांचा शिरकाव झाल्याने त्याबाबतीत आढावा बैठक तसेच मालेगाव शहरी व ग्रामीण नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने शहरात सुसज्ज अशा तीन रुग्णालयांचे भूमीपूजन व कोरोना सेवक व संस्था यांनी कोरोना काळात  केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल  मालेगावकरांच्यावतीने सत्कार समारंभ आयोजित करण्याच्या अनुषंगाने राज्याचे कृषी व माजी सैनिक कल्याणमंत्री दादाजी भुसे यांच्या प्रमुख उपस्थितीत शासकीय विश्रामगृहात सर्व विभागांच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांसमवेत    बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी मंत्री श्री.भुसे बोलत होते.

याबैठकीस अपर जिल्हाधिकारी श्रीमती मायादेवी पाटोळे, महानगर पालिका आयुक्त भालचंद्र गोसावी, उपविभागीय अधिकारी डॉ. विजयानंद शर्मा, अपर पोलीस अधिक्षक चद्रकांत खांडवी, तहसिलदार चंद्रजित राजपूत, गट विकास अधिकारी जितेंद्र देवरे, सामान्य रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. हितेश महाले, मनपा वैद्यकीय अधिकारी डॉ. सपना ठाकरे, तालुका वैद्यकीय अधिकारी सोनवणे, उपविभागीय कृषी अधिकारी दिलीप देवरे, पोलीस उपअधिक्षक प्रतापराव जाधव, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता एस.एम.देवरे, वीज वितरण कंपनीचे शिवगण, साळुंके, रामभाऊ मिस्तरी, डॉ.जतिन कापडणीस, अनिल पवार, प्रमोद पाटील तसेच विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

यावेळी मंत्री भुसे म्हणाले की, अनेक देशात कोरोनाचा नवा विषाणू ओमायक्रॉनचा महाराष्ट्राच्या काही भागात शिरकाव झाला असल्याने या ओमायक्रॉनचा फैलाव होणार नाही यासाठी सर्वानी जागृत राहून काळजी घेण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. मागील काळात कोरोनाची पहिली व दुसरी लाट आली त्या कालावधीमध्ये वेगवेगळया क्षेत्रातील संस्था व महानुभावांनी अतिशय समर्पीत भावनेने रुग्णांची सेवा केली त्या रुग्णसेवेला मालेगावकरांच्या वतीने आभार व ऋण व्यक्त करण्यासाठी एक छोटेखानी कार्यक्रम येत्या रविवारी आयोजित करण्यात येत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

पुढे बोलतांना मंत्री श्री. भुसे म्हणाले, महाराष्ट्र शासनासह केंद्र शासनाने देखील आरोग्य या विषयाला प्राधान्यक्रम दिला आहे. मालेगावकरांच्या आरोग्याच्या दृष्टीकोनातून संपूर्ण मालेगाव शहरामध्ये 5 मोठ्या रुग्णालयांची निर्मिती करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. मालेगाव शहाराच्या पूर्व भागांमध्ये 3 तर पश्चिम भागामध्ये 2 रुग्णालये उभारण्यात येणार असून पूर्व भागातील  रुग्णालय महापालिकेच्या मार्फत उभारण्यात येणार असून महाराष्ट्र शासन व केंद्र शासनाच्या संयुक्त विद्यमाने या रुग्णालयांना मान्यता मिळाली आहे. यापैकी 3 रुग्णालयाच्या इमारतींचे भुमीपूजन येत्या रविवारी आयोजित केल्याची माहिती त्यांनी याप्रसंगी दिली.

नियोजित भुमीपूजन करण्यात येणाऱ्या  रुग्णालयाबाबत माहिती देतांना मंत्री श्री. भुसे म्हणाले की, राष्ट्रीय आरोग्य अभियानातंर्गत मोसम पूल महिला बाल रुग्णालय येथे 33 कोटी 77 लाखाचे 100 खाटांचे अद्यावत रुग्णालय, प्रधानमंत्री जनविकास कार्यक्रमांतर्गत द्याने-रमजानपुरा येथे  4 कोटी 15 लाखाचे 15 खाटांचे अल्पसंख्याक रुग्णालय (केंद्राचा हिस्सा 2 कोटी 49 लाख राज्याचा हिस्सा 1 कोटी 66 लाख), अमेरिकन इंडीया फौडेशन ट्रस्टच्या सी. एस. आर. निधीतून मालेगाव कॅम्प भागातील रावळगाव नाक्याजवळ 4 कोटी 50 लाखाचे मॉड्युलर रुग्णालय उभारण्यात येणार आहेत. येणाऱ्या कालावधीमध्ये कोरोनाचे समुळ उच्चाटन होण्याच्या दृष्टीकोनातून काळजी घेण्याच्या दृष्टीने या रुग्णालयाची निर्मिती करण्यात येत आहे. ओमायक्रॉन विषाणूला आपल्या पासून लांब ठेवण्यासाठी व संसर्ग होऊ नये म्हणून शासनाने अधोरेखित केलेल्या नियमांचे व त्रिसूत्रीचे पालन कटाक्षाने करण्यासाठी आपल्यासह इतरांचीही सर्वांनी काळजी घ्यावी, असे आवाहनही मंत्री श्री. भुसे यांनी केले.