Site icon Krishi Pandhari | कृषी पंढरी

अतिवृष्टी : शेतकरी व आपत्तीग्रस्तांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे

नाशिकदि.30  : जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले असून व नागरिकांचे जनजीवनही विस्कळीत झालेले आहे. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या आणि आपत्तीग्रस्तांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे असून शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये, असा दिलासा राज्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी दिला आहे.

शासकीय विश्रामगृह येथे विविध विषयांवर आयोजित बैठकीत कृषिमंत्री दादाजी भुसे बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, प्रकल्प संचालक उज्ज्वला बावके, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी आनंद पिंगळे, नाशिक विभागाचे विभागीय कृषी सहसंचालक संजीव पडवळ आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

कृषिमंत्री दादाजी भुसे म्हणाले, अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पूरग्रस्तांना लवकरात लवकर मदत करण्यासाठी तात्काळ पंचनामे करण्यात यावे. एकही नुकसानग्रस्त व्यक्ती मदतीपासून वंचित राहणार नाही याची काळजी घ्यावी, अशा सूचना कृषिमंत्री श्री.भुसे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

शासकीय जमिनीवरील निवासाच्या उद्देशाने केलेली अतिक्रमण नियमानुकूल करण्याच्या प्रलंबित प्रस्तावांना गती देण्याबाबतची सूचना कृषिमंत्री श्री. भुसे यांनी जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांना दिली .

यावेळी आरोग्य विभागाचा, रुरबन योजना, जलजीवन मिशन योजनेचा आढावा कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी घेतला.

Exit mobile version