मुंबई, दि. 29 : कापूस खरेदी हंगाम २०२०-२१ च्या पूर्वतयारीबाबत सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी आज मंत्रालयात आढावा घेतला. यावेळी श्री. पाटील म्हणाले, कृषी खात्याच्या अंदाजानुसार सन २०२०-२१ हंगामामध्ये ४२.०७ लाख हेक्टर इतक्या क्षेत्रावर कापसाचे पीक घेण्यात आलेले असुन ४५० लाख क्विंटल कापूस (९०० लाख गाठी) इतक्या मोठया प्रमाणात उत्पादन अपेक्षित आहे. याचा विचार करून भारतीय कपास निगम (CCI), महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघ यांनी सुरुवाती पासूनच कापूस खरेदीचे नियोजन करावे.
जिनिंग प्रेसिंग फॅक्टरी यांच्याशी समन्वय ठेवून कापूस खरेदीचे नियोजन करून प्रत्येक कापूस खरेदी केंद्रावर किमान १ ग्रेडर असावा. कापूस खरेदी पूर्वीच कृषि विभागामार्फत आवश्यक ते मुनष्यबळ ग्रेडर म्हणुन उपलब्ध करुन घेऊन त्यांना हंगामपूर्व प्रशिक्षण देऊन नेमणुकीचे आदेश द्यावेत. खरेदी केलेला कापूस साठवणुकीची व्यवस्था, सोयी सुविधा इतर नैसगिक आपत्तीपासून संरक्षण करण्याच्या दृष्टीने गोदाम, शेड, ताडपत्री इ.व्यवस्था करावी. बाजार समितीच्या स्तरावर शेतकरी निहाय नोंदवही/रेकॉर्ड ठेवले जावे. ज्यामध्ये कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे नाव, पत्ता, बँक खात्याचा तपशील असावेत. कापूस खरेदी केंद्रावर आणण्यापूर्वी संबंधित शेतकऱ्यांना कापूस खरेदीचे ठिकाण व वेळ एस.एम.एस.द्वारे पाठविण्यात यावे. याबाबत कृषि उत्पन्न बाजार समिती समन्वय ठेवून भारतीय कपास निगम, कपास भवन व महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक यांनी नियोजन करावे, अशा सूचनाही श्री. पाटील यांनी यावेळी केल्या.
कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता शेतकऱ्यांची एकाच वेळी खरेदी केंद्रावर गर्दी होणार नाही या दृष्टीने सर्व उपाययोजना करावी. तसेच गाडी पार्किंग, शेतकऱ्यांना बसण्याची व्यवस्था करावी. असेही श्री. पाटील यांनी यावेळी सांगितले.
बैठकीला कृषी व पणन विभागाचे प्रधान सचिव अनुप कुमार, पणन महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक नवीन सोना, सीसीआयचे मुख्य महाव्यवस्थापक, कृषी पणन संचालक सतीश सोनी, सीसीआयचे व्यवस्थापकीय संचालक पी. के. अग्रवाल संबंधित अधिकारी उपस्थित होते.