Site icon Krishi Pandhari | कृषी पंढरी

केदारनाथ इथे पंतप्रधानांच्या हस्ते शिलान्यास

“काही अनुभव इतके अलौकिक असतात, इतके अनंत असतात की ते शब्दात व्यक्त करता येत नाहीत मला बाबा केदारनाथ धाम इथे अशीच अनुभूती येते”

पंतप्रधान, श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते केदारनाथ इथे शिलान्यास आणि विविध विकास प्रकल्प राष्ट्राला समर्पित करण्यात आले.  त्यांनी श्री आदि शंकराचार्य यांच्या समाधीचे उद्घाटन केले आणि श्री आदि शंकराचार्य यांच्या  अनावरण केले.  तसेच कार्यान्वित आणि सुरु असलेल्या पायाभूत सुविधांच्या कामांचा आढावा घेत पाहणी केली.  पंतप्रधानांनी केदारनाथ मंदिरातही पूजा केली.  केदारनाथ धाम इथल्या कार्यक्रमासह देशभरातील बारा ज्योतिर्लिंग आणि चारधाम तसेच अनेक श्रद्धास्थानांवर प्रार्थना आणि उत्सव साजरा करण्यात आला, हे सर्व कार्यक्रम केदारनाथ धाम येथील मुख्य कार्यक्रमाशी जोडले होते.

पंतप्रधानांनी मेळाव्याला संबोधित करताना, भारताच्या महान आध्यात्मिक ऋषी परंपरेचे स्मरण केले आणि केदारनाथ धाममध्ये आल्यामुळे अवर्णनीय आनंद झाल्याचे सांगितले.

नौशेरा येथे काल सैनिकांशी झालेल्या संवादाची आठवण करून देताना ते म्हणाले, काल दिवाळीच्या दिवशी त्यांनी 130 कोटी भारतीयांच्या भावना सैनिकांपर्यंत पोहचल्या होत्या. आज गोवर्धन पूजेविषयी  ते म्हणाले की, मी सैनिकांच्या भूमीवर आणि केदार बाबांच्या दिव्य सानिध्यात होतो.   पंतप्रधानांनी रामचरितमानसमधील एक श्लोक उद्धृत केला- ‘अबिगत अकथ अपार, नेति-नेति नित निगम कहे’ अर्थात, काही अनुभव इतके अलौकिक, इतके अनंत आहेत की ते शब्दात व्यक्त करता येत नाहीत.  बाबा केदारनाथ यांच्या सान्निध्यात हीच अनुभूती येते असे ते म्हणाले.

केदारनाथ येथील धर्मशाळा, सुविधा केंद्रे यासारख्या नवीन सुविधा साधु आणि भाविकांचे जीवन सुसह्य करतील. त्यांना तीर्थक्षेत्राची परिपूर्ण दिव्य अनुभूती देतील, असे पंतप्रधान म्हणाले.  2013 साली केदारनाथमधे आलेल्या पुराची आठवण काढत पंतप्रधान म्हणाले की काही वर्षापूर्वी पुरामुळे झालेले नुकसान अकल्पनीय होते.  “जे लोक इथे यायचे त्यांना वाटायचे की हे आमचे केदारधाम पुन्हा उभे राहील का?  पण माझा आतला आवाज सांगत होता की ते पूर्वीपेक्षा अधिक गर्वाने उभे राहील.”  भगवान केदार यांची कृपा आणि आदि शंकराचार्यांच्या प्रेरणेमुळे तसेच भुज भूकंपानंतरच्या परिस्थितीचे व्यवस्थापन करण्याचा अनुभव गाठीशी असल्यामुळे त्या कठीण काळात माझी मदत होऊ शकली, असे पंतप्रधान म्हणाले. ज्या जागेने त्यांचे पालनपोषण केले होते त्या जागेची सेवा करू शकलो हा आशीर्वाद आहे अशी वैयक्तीक भावनाही पंतप्रधानांनी व्यक्त केली. केदार  धाम येथील विकासकामांसाठी अथक पाठपुरावा केल्याबद्दल त्यांनी सर्व कार्यकर्ते, साधू, पुजारी रावल कुटुंबीय, अधिकारी आणि मुख्यमंत्र्यांचे आभार मानले.  मी म्हणालो की ड्रोन आणि इतर तंत्रज्ञानाद्वारे कामावर ‘तो’ लक्ष ठेवतो.  ते म्हणाले की, “या प्राचीन भूमीवरील शाश्वततेशी आधुनिकतेचा मिलाफ, ही विकास कामे भगवान शंकराच्या नैसर्गिक कृपेचे फळ आहे.”

आदि शंकराचार्यांबद्दल बोलताना श्री मोदी म्हणाले की संस्कृतमध्ये शंकराचा अर्थ आहे – “शं करोति सः शंकरः”.  म्हणजेच जो कल्याण करतो तोच शंकर.  हा अर्थांश आचार्य शंकर यांनी प्रत्यक्ष आचरणातून सिद्ध केला.  त्यांचे जीवन जितके विलक्षण होते तितकेच ते सामान्य माणसाच्या कल्याणासाठी समर्पित होते, असे ते म्हणाले.  पंतप्रधानांनी आठवण करून दिली की एक काळ होता जेव्हा अध्यात्म आणि धर्म, रूढी तसेच कालबाह्य प्रथांशी जोडले जाऊ लागले.  तर, भारतीय तत्त्वज्ञान मानवी कल्याणाविषयी सांगते, जीवनाकडे समग्रतेने पाहते.  या सत्याची जाणीव समाजाला करून देण्याचे काम आदि शंकराचार्यांनी केले, असे ते म्हणाले.

आपला सांस्कृतिक वारसा, श्रद्धेची केंद्रे आज पाहिल्या जायला हवीत त्याच योग्य आणि न्याय्य गौरवभावाने पाहिली जात आहेत, यावर पंतप्रधानांनी यावर भर दिला.  “अयोध्येत भगवान श्री रामांचे भव्य मंदिर उभारले जात आहे.  अयोध्येला पुन्हा वैभव प्राप्त होत आहे.  आता दोनच दिवसांपूर्वी अयोध्येत दीपोत्सवाचा भव्य सोहळा संपूर्ण जगाने पाहिला.  आज आपण कल्पना करू शकतो की भारताचे प्राचीन सांस्कृतिक स्वरूप कसे असावे”,असे  श्री मोदी म्हणाले.  पंतप्रधान म्हणाले की, आजच्या भारताला आपल्या वारशावर विश्वास आहे.  “आज भारत स्वतःसाठी कठीण उद्दिष्टे आणि निर्धारित मुदत ठेवतो.  भारताला आज कालमर्यादा आणि उद्दिष्टांबाबत भिती वाटणे मान्य नाही,”.  स्वातंत्र्यलढ्यातील वीरांच्या योगदानाबद्दल बोलताना पंतप्रधानांनी देशवासियांना भारताच्या गौरवशाली स्वातंत्र्यलढ्याशी संबंधित ठिकाणे आणि धार्मिक तीर्थक्षेत्रांना भेटी देऊन भारताचा आत्मा जाणून घ्या असे सांगितले.

21व्या शतकातील तिसरे दशक हे उत्तराखंडचे असल्याचे पंतप्रधान म्हणाले.  चारधाम यांना महामार्गांद्वारे  जोडणाऱ्या चारधाम रस्ते प्रकल्पाचे काम वेगाने सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली.  भविष्यात केबल कारच्या माध्यमातून भाविक केदारनाथच्या दर्शनासाठी यावेत यासाठी काम सुरू झाले आहे. इथे जवळच पवित्र हेमकुंड साहिबजी आहे.  हेमकुंड साहिबचे दर्शन सुलभ व्हावे यासाठी रोपवे बांधण्याचे काम सुरू आहे.  “उत्तराखंडच्या लोकांच्या अफाट क्षमतांवर असलेला पूर्ण विश्वास लक्षात घेऊन, राज्य सरकार उत्तराखंडच्या विकासाच्या ‘महायज्ञा’मध्ये सहभागी आहे”, असे ते म्हणाले.

कोरोनाविरुद्धच्या लढाईत उत्तराखंडने दाखवलेल्या शिस्तीचे पंतप्रधानांनी कौतुक केले.  भौगोलिक अडचणींवर मात करून, आज उत्तराखंड आणि तेथील जनतेने 100% पहिल्या मात्रेच्या लसीकरणाचे लक्ष्य गाठले आहे.  हीच उत्तराखंडची ताकद आहे, हेच सामर्थ्य ताकद आहे, असे ते म्हणाले.  “उत्तराखंड खूप उंचावर वसलेले आहे.  माझे उत्तराखंड स्वतःच्या उंचीपेक्षाही जास्त उंची गाठेल”, अशा शब्दात पंतप्रधानांनी आपल्या भाषणाचा समारोप केला.

2013 च्या महापुरात झालेल्या नुकसानानंतर श्री आदि शंकराचार्य समाधीची पुनर्बांधणी करण्यात आली आहे.  संपूर्ण पुनर्बांधणीचे काम पंतप्रधानांच्या मार्गदर्शनाखाली हाती घेण्यात आले, प्रकल्पाच्या प्रगतीचा त्यांनी सतत आढावा घेतला आणि निरीक्षण केले आहे.  आज देखील, पंतप्रधानांनी सरस्वती भक्ती मार्ग कार्यान्वित केला आणि सुरु असलेल्या कामांचा आढावा घेत पाहणी केली.  सरस्वती भक्ती मार्ग संरक्षक भिंत आणि घाट, मंदाकिनी भक्ती मार्ग संरक्षक भिंत, तीर्थ पुरोहित गृह आणि मंदाकिनी नदीवरील गरुड चाटी पूल यासह मुख्य पायाभूत सुविधा प्रकल्प पूर्ण झाले आहेत.  130 कोटींहून अधिक खर्चाचे प्रकल्प पूर्ण झाले आहेत. संगम घाटाचा पुनर्विकास, प्रथमोपचार आणि पर्यटक सुविधा केंद्र, प्रशासन कार्यालय आणि रुग्णालय, दोन अतिथी गृहे, पोलीस ठाणे, कमांड अँड कंट्रोल सेंटर, मंदाकिनी भक्ती मार्ग रांग व्यवस्थापन, पावसापासून संरक्षण देणारा निवारा आणि सरस्वती नागरी सुविधा इमारत यासह 180 कोटींहून अधिक खर्चाच्या अनेक प्रकल्पांची पायाभरणीही आज पंतप्रधानांनी   केली.

 

YouTube video player

Exit mobile version